डोंबिवलीमध्ये लष्कराच्या मदतीने पूल उभारा; मनसेचा आंदोलनाचा इशारा

डोंबिवलीमध्ये लष्कराच्या मदतीने पूल उभारा; मनसेचा आंदोलनाचा इशारा

डोंबिवलीतील कोपर पूर

डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा रेल्वेवरील कोपर उड्डाणपूल सोमवार २७ मे पासून वाहतुकीस बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. रेल्वे प्रशासन केडीएमसी आणि वाहतूक पोलीस यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे संभ्रमावस्था पसरली आहे. त्यामुळे सोमवारी पुलाची पाहणी करण्यासाठी एकही अधिकारी फिरकला नाही. पर्यायी मार्गाची व्यवस्था न करता पूल बंद करण्यास मनसेने विरोध दर्शविला आहे. डोंबिवली पूलाची अवस्था कल्याणच्या पत्रीपुलासारखी होऊ नये. त्यामुळे लष्कराच्या मदतीने पुलाची उभारणी करावी अशी मागणी मनसेने केली आहे. अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर रेल्वे उड्डाणपूल हा वाहतुकीसाठी सर्वात महत्वाचा पूल आहे. मुंबई आयआयटीने पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करीत हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचा अहवाल रेल्वे प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने २७ मे पासून हा पूल वाहतुकीस बंद करण्याचा निर्णय पालिकेला कळविला होता. पर्यायी व्यवस्थांची चाचपणी न करता पूल वाहतुकीस बंद करण्यास पालिका प्रशासन अनुकूल नाही. तसेच या निर्णयाचे लोकप्रतिनिधी व नागरिकांमध्येही तीव्र पडसाद उमटले आहे. मनसेने पूल बंदीस विरोध दर्शविला आहे. वाहतुकीला सक्षम पर्याय नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. तसेच पावसाळा आणि शाळा सुरू झाल्यानंतर वाहतुकीची अवस्था खूपच बिकट होऊ शकते अशीही भिती व्यक्त करण्यात येत आहे. पूल बंद करण्यापूर्वी रेल्वे प्रशासन, पालिका आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे पाहणी करण्याचे ठरले. मात्र सोमवारी एकही अधिकारी फिरकला नाही. पालिका आयुक्त गोविंद बोडके हे मंत्रालयातील बैठकीला हजर होते. तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांना पाहणी दौरा असल्याची माहिती नाही. त्यामुळे एकंदरीत डोंबिवलीकरांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप मनसेचे गटनेता मंदार हळबे यांनी केला आहे.

‘त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाई करा

सहा महिन्यापूर्वीच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमवेत या पुलाची पाहणी केली होती. त्योवळी अधिकाऱ्यांनी पूल धोकादायक नसल्याचे स्पष्ट केलं होत. त्यानंतर आयआयटीने हा पूल धोकादायक जाहीर केला आहे. त्यामुळे रेल्वेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी हळबे यांनी केली आहे. कोपर पूल धोकादायक झाला असेल तर रेल्वे आणि पालिका प्रशासनाने तातडीने निर्णय घेणे अपेक्षित आहे. कल्याणातील पत्रीपूल तोडून आठ महिन्यांचा कालावधी लोटला मात्र अजूनही जैसे थे आहे. त्यामुळे नागरिक व वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा रोजचा मनस्ताप सहन करावा लागतोय. त्यामुळे कोपरपूल पाडल्यानंतर त्याचा पत्रीपूल होऊ नये, अशी अपेक्षा मनसेने व्यक्त केली. तसेच आंबिवली व एल्फिन्स्टन स्टेशनवरील पूलाचे काम लष्काराकडून करण्यात आले. त्याचप्रमाणे कोपर पुलाचे काम करावे, अशीही मागणी केली आहे. त्यामुळे रेल्वे व पालिका प्रशासन काय निर्णय घेते याकडे लक्ष लागलं आहे.

First Published on: May 27, 2019 8:32 PM
Exit mobile version