शनिवारी कोसळलेली बस शनिवारीच बाहेर काढणार

शनिवारी कोसळलेली बस  शनिवारीच बाहेर काढणार

पोलादपूर बस अपघात

पोलादपूर: रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागामध्ये असलेल्या आंबेनळी घाटामध्ये शनिवारी 28 जुलै 2018 रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास डॉ.बाळासाहेब सावंत दापोली कृषी विद्यापीठाचे कर्मचारी विकएन्डसाठी बसने महाबळेश्वरला सहलीसाठी निघाले होते. त्यावेळी पोलादपूर तालुक्यातील दाभिळ आणि आंबेमाची गावांलगतच्या दरीमध्ये बस कोसळून 30 प्रवासी मृत्यूमुखी पडले होते. शनिवारी २८ जुलैला कोसळलेली ही बस आज शनिवारी 6 ऑक्टोबरला दरीतून बाहेर काढण्यात येणार आहे. शनिवार ते शनिवार अशा साम्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी सापडणार्‍या मोबाईल्ससह अन्य काही पुराव्यांची कसून तपासणी करून शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.

डॉ.बाळासाहेब सावंत दापोली कृषी विद्यापीठाचे कर्मचारी बसने महाबळेश्वरला सहलीसाठी निघाले असता आंबेनळी घाटात सुमारे 1200 फूट खोल दरीत बस कोसळून शनिवारी सकाळी झालेल्या अपघातानंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत महाबळेश्वर ट्रेकर्स आणि सह्याद्री ट्रेकर्सच्या टीमने खेड, पोलादपूर, महाडचे सेवाभावी कार्यकर्ते आणि स्थानिकांच्या मदतीने तब्बल 14 मृतदेह दरीतून बाहेर काढले. यानंतर एनडीआरएफच्या जवानांनी रात्री मोहीम सुरू ठेऊन रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत 22 मृतदेह दरीतून बाहेर काढले.सकाळी साडेनऊ वाजता दरीमध्ये केवळ 8 मृतदेह असल्याचे आढळून आल्याने अपघातग्रस्त बसमध्ये बाळासाहेब सावंत दापोली कृषी विद्यापीठाचे केवळ 30 कर्मचारी आणि वाहन चालक असे 31 जणच प्रवास करीत असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, या अपघातातून केवळ प्रकाश सावंत देसाई हे एकमेव अधिकारी आश्चर्यकारकरित्या बचावले तर त्यांच्या विविध वृत्तवाहिन्यांवरील विधानांमुळे ते वादासह संशयाच्या भोवर्‍यात सापडले. अपघात की घातपात अशा चर्चेपर्यंत या वाद आणि संशयाचे स्वरूप होऊन याचा शेवट प्रकाश सावंत देसाई यांची बदली रत्नागिरी येथे होऊन हा विषय काहीसा थांबला.

आज शनिवार 6 ऑक्टोबर रोजी आंबेनळी घाटात कोसळलेली ती (एमएच 08ई 9087) अपघातग्रस्त बस दरीतून बाहेर काढण्यात येणार आहे. यासोबतच काही मृतांचे मोबाईल आणि लॅपटॉप तसेच अन्य काही ऐवज आढळून येतो का, याचाही शोध घेतला जाणार आहे. दरम्यान, बुधवारपासून आंबेनळी घाटात परतीच्या पावसाने रोज संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह हजेरी लावण्यास सुरूवात केली असून धुकेही सकाळी दाटून येते. त्यामुळे शनिवारी अपघातग्रस्त बस दरीबाहेर काढताना हवामानाचीही साथ मिळाल्यास अनेक गोष्टींचा उलगडा होईल,अशी अपेक्षा आहे. शेवटच्या क्षणी बसच्या स्टेअरिंगवर कोणाच्या हाताचे ठसे होते, ही अपेक्षा खूप वेळ लोटल्याने फोल ठरण्याची शक्यता असली तरी केमिकल टेस्टद्वारे अन्य काही धागेदोरे आढळून येतात का, याबाबतही प्रयत्न केले जाणार आहेत.

बसचे पुढे काय होणार ?

डॉ.बाळासाहेब सावंत दापोली कृषी विद्यापीठाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने या अपघाताला वाहनचालकच जबाबदार असल्याचे मत व्यक्त करून संदिग्धता निर्माण केली आहे, तर आणखी दोन्ही वाहन चालक हे प्रशिक्षित असल्याचा निर्वाळाही दिला. यामुळे अपघातावेळी दोन्ही मृत झालेल्या वाहनचालकांखेरीज कोणी अन्य वाहन चालवत होते का, याचा शोध घेण्यात येईल. अगदीच कोणताही पुरावा न आढळल्यास सदर अपघातग्रस्त बस भंगारात जमा करून ऑडीट क्लिअरही करण्याचा प्रकार होऊ शकेल, असे काहींचे म्हणणे आहे. मात्र, ही बस शनिवारी दरीत कोसळली आणि शनिवारीच दरीबाहेर काढण्यात येणार असल्याने या योगायोगावर कोकणात सर्वत्रच चर्चेला ऊत आला आहे.

First Published on: October 5, 2018 12:05 AM
Exit mobile version