केंद्रीय यंत्रणांचा वापर विरोधकांना टार्गेट करण्यासाठी होतोय – संजय राऊत

केंद्रीय यंत्रणांचा वापर विरोधकांना टार्गेट करण्यासाठी होतोय – संजय राऊत

देशातला गावागावात पोहचलेला, सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे कॉंग्रेस पक्ष आहे. देशाच्या स्वातंत्र चळवळीत योगदान दिलेला असा कॉंग्रेस पक्ष आहे. सोनिया गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पक्षासाठी मोठा त्याग केला आहे. विरोधी पक्षाचे नेते म्हणून अपशब्द वापरून बोलणे संस्कृती नाही, पण गेल्या काही दिवसांमध्ये हा प्रकार समोर आलेला आहे. सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांना त्रास दिला जात आहे, त्यामध्ये गांधी परिवारसुद्धा आहे. इतरसुद्धा नेते आहेत, आम्हीसुद्धा आहोत. कितीही प्रयत्न केले तरीही आम्ही विरोधक म्हणून भविष्यात एकत्र उभे राहून संघर्ष करू असे शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत म्हणाले. मुंबईत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. देशाचा इतिहास आहे की, विरोधी पक्ष आज जरी कमकुवत वाटत असला तरीही तो फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेतो आणि आपली ताकद दाखवतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पक्षात लोकशाही असल्याचा दावा असला तरीही भाजपमध्ये नरेंद्र मोदी नेता आहेत, त्यांच्या नावाने पक्ष चालतो. ठाकरे परिवाराच्या नावाने महाराष्ट्रात पक्ष चालतो. प्रत्येक पार्टीचा एक चेहरा असतो. तो चेहरा म्हणजे साम्राज्य नसते. प्रत्येक परिवाराने पक्ष उभा करण्यासाठी अनेक प्रकारच्या गोष्टी समर्पित केलेल्या असतात. जर लोकांना वाटत असेल तर कॉंग्रेस पक्षात गांधी परिवार पक्षाचे नेतृत्व करत असेल तर तो पक्षाचा निर्णय आहे. कॉंग्रेससारखेच समाजवादी, जनतादल युनायटेड या पक्षातही अंतर्गत गट आहेत, पण हेच लोकशाहीचे लक्षण असल्याचे राऊत म्हणाले.


 

 

 

First Published on: January 7, 2021 10:38 AM
Exit mobile version