मध्य रेल्वेला प्रवाशांचा इशारा, १ जुलैला करणार निषेध!

मध्य रेल्वेला प्रवाशांचा इशारा, १ जुलैला करणार निषेध!

प्रातिनिधिक फोटो

गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेवरच्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेकदा रेल्वेचा खोळंबा झाल्यामुळे कामकरी मुंबईकराचाही खोळंबा झाला. त्यामुळे वैतागलेल्या प्रवाशांनी अखेर मध्य रेल्वेविरुद्ध निषेधाचा पवित्रा घेतला आहे. येत्या १ जुलै रोजी मध्य रेल्वे मार्गावरील प्रवासी संघटनांनी निषेध करण्याचा निर्णय घेतला असून या दिवशी प्रवासी संघटनांचे सदस्य काळ्या फिती बांधून प्रवास करणार आहेत. मध्य रेल्वेच्या होणाऱ्या खरडपट्टीबाबत रेल्वे प्रशासनाला कोणतंही गांभीर्य नसल्याने हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी आणि रेल्वेच्या सल्लागार समितीमधील ज्येष्ठ रेल्वे अभ्यासकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रवासी सापडले कात्रीत

जवळपास महिनाभर मध्य रेल्वेच्या प्रवाशांना हा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मग त्यासाठी कधी सिग्नल यंत्रणेत झालेला बिघाड कारणीभूत ठरला, तर कधी रुळांना तडे गेल्यामुळे रेल्वे खोळंबली, तर कधी ओव्हरहेड वाहिन्यांमध्ये दोष निर्माण झाल्यामुळे मरे रखडली. त्यामुळे मध्य रेल्वेचं वेळापत्रक अनेकदा कोलमडलेलं पाहायला मिळालं आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने गेल्या महिन्याभरात तब्बल ५००हून अधिक फेऱ्या रद्द केल्या आहेत. मुलुंडपासून पुढे ठाणे, डोंबिवली, कल्याण, कर्जत, कसारा, अंबरनाथ या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवाशांना प्लॅटफॉर्मवरच ‘वेटिंग’ करावं लागलं. अनेकदा तर हा बिघाड ऐन कामावर जाण्याच्या किंवा गर्दीच्या वेळी झाल्यामुळे त्याचा मनस्ताप आणि त्यात ऑफिसमध्ये लेटमार्क अशा दुहेरी कात्रीत मुंबईकर अडकले.


हेही वाचा – मध्य रेल्वे वारंवार विस्कळीत; प्रवाशांसाठी ‘मनसे’ची धाव!

आता तरी जाग येईल का?

दरम्यान, याप्रकरणी वारंवार तक्रार करून देखील रेल्वे प्रशासन मात्र त्याची कोणतीही दखल घेत नसल्यामुळे आम्हा प्रवासी संघटनांना निषेध करण्याचा पर्याय निवडावा लागला, अशी माहिती प्रवासी संघटनांकडून देण्यात आली आहे. मात्र, आता त्यानंतर तरी मध्य रेल्वे प्रशासनाला जाग येईल का? या प्रश्नाचं उत्तर १ जुलैनंतरच मिळू शकेल.

First Published on: June 23, 2019 5:46 PM
Exit mobile version