मुंबईकर सावधान! बदलती जीवनशैली, प्रदूषणाने कमी होतेय रोग प्रतिकारशक्ती

मुंबईकर सावधान! बदलती जीवनशैली, प्रदूषणाने कमी होतेय रोग प्रतिकारशक्ती

मुंबईत गॅस्ट्रोची वाढती डोकेदुखी

वातावरणातील लहानशा बदल्याने मुंबईकर आजारी पडू लागले आहेत. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकापर्यंत सर्वांनाच बदलत्या वातावरणाचा त्रास होत आहे. कोण सर्दीने हैराण, कोण खोकल्याने तर कोण तापाने फणफणलेलं आहे. खासगी, सरकारी, पालिकेची हॉस्पिटल्स आणि फॅमिली डॉक्टरकडे रुग्ण मुंबईकरांची भली मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ही परिस्थिती सध्या का ओढावली आहे ? त्याचे कारण मुंबईकरांची रोग प्रतिकारशक्ती कमी झाली आहे. हो! मुंबईकरांची रोग प्रतिकारशक्ती कमी झाली.. तसे तज्ज्ञ डॉक्टरांचेच मत आहे.

कामाचा ताण, अपुरी झोप, घराबाहेरचे विशेषत: फेरीवाल्यांकडे होणारे खाणे, शहरात जागोजागी होणारी बांधकामे, त्यातून उडणारी धूळ, गाड्यांचे आणि माणसांच्या श्वासोच्छवासाने होणारे प्रदूषण यामुळे मुंबईकरांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम झाला आहे. रस्त्यावर मिळणार्‍या खाद्य पदार्थांचे सेवन, आरोग्य आणि अन्नाद्वारे पसरणार्‍या रोगांचा अगदी जवळचा संबंध आहे. पण, असे पदार्थ खाल्ल्यानंतर होणार्‍या परिणामांबाबत कमी प्रमाणात असणार्‍या जागरुकतेमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर होत आहे. रस्त्यावरील खाद्य पदार्थांशी निगडीत अस्वच्छता, असुरक्षित पाण्याचा वापर, प्रदूषणाचा परिणाम या काही अशा गोष्टी आहेत, ज्याचा परिणाम शरीराच्या रोग प्रतिकारशक्तीवर होत आहे.

खाण्यापिण्याच्या सवयी आणि प्रदूषण या दोन्ही गोष्टींचा परस्पर संबंध आहे. सतत स्ट्रीट फूड खाल्ल्यामुळे त्याचा परिणाम जीवनशैलीवर होतो. तसेच, जर १५-१६ तास काम केल्यामुळे आणि पुरेशी झोप घेत नसल्यामुळे त्याचा रोग प्रतिकारशक्तीवर थेट परिणाम होतो. पावसात रस्त्यावरील पाणी, खाद्यपदार्थ खाल्ले तर त्याचा शरीरावर परिणाम होऊन संसर्ग होऊ शकतो.

त्याखालोखाल वातावरणात वाढलेले प्रदूषण रोगप्रतिकारशक्ती कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे कारण आहे. रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्याने श्वसनाचा त्रास, रक्तदाब, मानसिक आरोग्य आणि फुप्फुसांचे विकार तात्काळ जडतात. शरीराच्या प्रत्येक अवयवांवर प्रदूषणाचा परिणाम होतो, अशी माहिती संक्रमण रोगाचे तज्ज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव यांनी दिली आहे.

रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे लहान मुलांवर त्याचा मोठा परिणाम दिसून आला आहे. वातावरणात असणार्‍या विषाणू, जीवाणूंच्या संसर्गामुळेही मुलांच्या प्रतिकारशक्तीवर फरक पडत असल्याचे डॉक्टर सांगतात. मुंबईच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधील लहान मुलांच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज जवळपास ८० रुग्ण दाखल होत आहेत. या सर्व मुलांना सर्दी, ताप, खोकला आणि जुलाब याच तक्रारी असल्याचे बालरोग विभागाच्या प्रमुख आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. श्रुती ढाले यांनी सांगितलं.

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काय कराल

  1. शरीराला किमान ८ तास झोप देण्यामुळे रोगप्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत होते.
  2. दिवसाला ४ लीटर पाणी पिण्याने शरीरातील टॉक्सिक बाहेर पडण्यास मदत होते.
  3. दररोजच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये केलेला बदल रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यास गरजेचा आहे.
  4. शारिरीक आणि मानसिक ताण कमी केल्यास रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते.

वातावरणाच्या प्रदूषणामुळे शिवाय, जिवाणू , विषाणुंमुळे लहान मुलांची, ज्येष्ठांची, सर्वच वयोगटातील लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. शिवाय, जेवणातून योग्य प्रमाणात न मिळालेल्या जीवनसत्त्वामुळे, प्रथिनांमुळे, अपुर्‍या झोपेमुळेही प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो.
डॉ. श्रुती ढाले, बालरोगतज्ज्ञ, बालरोग विभाग प्रमुख, सेंट जॉर्ज हॉस्पिटल

मुंबईकर ज्येष्ठ नागरिक काय करावे

वाढत्या वयाबरोबर योग्य, संतुलित आहार, योग्य हार्मोन्स आणि चांगली रोगप्रतिकारक शक्ती असणे महत्वाचे आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या वागण्यात थोडा लवचिकपणा आणला तर ताणतणावचे कारण राहत नाही. विटामिन-डी इम्यून सिस्टमसाठी महत्वाचे असते. विविध फळांमध्ये आणि भाज्यामध्ये एंटीऑक्सिडेंट भरपूर असते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे प्रोटीन आणि खनिज असतात. त्यामुळे भाज्यांचा जेवणात जास्तीत जास्त समावेश करावा. नियमित दही, इडली, डोसा यांचा समावेश आहारात केला पाहिजे. रोज अर्धी वाटी दही खाल्ल्याने पचनशक्ती वाढून पचनासंबंधित आजार बरे होतात.

लहान मुलांची रोग प्रतिकारशक्ती कशी वाढवाल

  1. पावसाळ्यात लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती टिकून राहावी यासाठी त्यांना भरपूर पाणी प्यायला द्यावे.
  2. बाहेरचे अन्नपदार्थ न देता घरचे हलके जेवण द्यावं.
  3. पावसाच्या पाण्यात फिरायला देऊ नये.
  4. व्हायरल इंन्फेक्शन झाल्यास ३ ते ५ दिवस पूर्णपणे बरं होत नाही तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवू नये. इतरांना संसर्गाचा धोका टाळता येऊ शकतो.
  5. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना किमान आठ ते साडेआठ तास झोपू द्यावे.

हेही वाचा –

स्वत:चा बोल्ड सीन लीक झाल्यावर भडकली राधिका आपटे

रो-रो सेवा अखेर मुहूर्त मिळाला

First Published on: July 19, 2019 9:08 AM
Exit mobile version