धनंजय मुंडेंनंतर छगन भुजबळही रुग्णालयात दाखल, उपचार सुरू

धनंजय मुंडेंनंतर छगन भुजबळही रुग्णालयात दाखल, उपचार सुरू

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि बीडमधील महत्त्वाचे नेते धनंजय मुंडे यांना किडनी स्टोनच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल केलेले असतानाच आता नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि फायरब्रॅण्ड नेते छगन भुजबळ यांना देखील प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छगन भुजबळांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निवडणूक काळात आलेल्या ताणामुळेच त्यांची प्रकृती बिघडल्याचं देखील बोललं जात आहे. निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक प्रचार करण्यात छगन भुजबळ आघाडीवर होते.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये छगन भुजबळ यांनी त्यांचा बालेकिल्ला असलेल्या येवला मतदारसंघातून विजय मिळवला. शिवसेनेचे उमेदवार संभाजी पवार यांचा त्यांनी मोठ्या फरकाने पराभव केला होता. मात्र, त्याचवेळी त्यांचे पुत्र पंकज भुजबळ यांचा मात्र नांदगाव मतदारसंघात पराभव झाला आहे.

धनंजय मुंडेंवरदेखील उपचार सुरू

दरम्यान, बुधवारी रात्रीच धनंजय मुंडे यांना किडनी स्टोनचा त्रास होऊ लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर चर्चगेटजवळच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन त्यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.


वाचा सविस्तर – धनंजय मुंडे किडनी स्टोनने त्रस्त; बॉम्बे रुग्णालयात उपचार
First Published on: October 31, 2019 12:52 PM
Exit mobile version