‘मुख्यमंत्र्यांकडून काँग्रेस पक्ष फोडण्याचा प्रयत्न सुरु’

‘मुख्यमंत्र्यांकडून काँग्रेस पक्ष फोडण्याचा प्रयत्न सुरु’

देवेंद्र फडणवीस

लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले म्हणून भाजपने हुरळून जाण्याची गरज नाही. या सरकारवर लोक नाराज आहेत, ही वस्तुस्थिती आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे निकाल वेगवेगळे असू शकतात, हे यापूर्वी अनेकदा सिद्ध झाले आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील निकाल लोकसभेपेक्षा वेगळे असतील, असा दावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.

कोणी पक्ष सोडेल असं वाटत नाही

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची आज टिळकभवन येथे जिल्हानिहाय बैठक पार पडली. या बैठकीनंतर अशोक चव्हाण यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेस आघाडी शिल्लक ठेवणार नाही, या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. लोकसभेचा एक विजय मिळाला म्हणून विखे पाटील यांनी फाजील आत्मविश्वास बाळगणे योग्य नसल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. काँग्रेस पक्षाचे आमदार फोडण्यासाठी मुख्यमंत्री प्रचंड खटाटोप करीत आहेत. अनेक आमदारांना ते फोन देखील करीत आहेत. मात्र आता कोणीही पक्ष सोडेल, असे वाटत नसल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

काँग्रेस संघाचे अनुकरण करणार नाही

निवडणूक आली की शिवसेनेला राम मंदिराची आठवण होते. आता विधानसभेची निवडणूक जवळ येत असल्याने उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर निघाले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास त्यांनी नकार दिला. संघाकडून घेण्यासारखं काहीही नाही. काँग्रेस पक्ष नेहमी संघाशी संघर्ष करीत आला आहे. आम्ही कधीही संघाचं अनुकरण करणार नाही, असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – 

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जिल्हानिहाय बैठका

First Published on: June 7, 2019 6:28 PM
Exit mobile version