‘मुख्यमंत्री ठाकरेंचा एकेरी उल्लेख, सरकार काय करतंय’; पवारांचा राऊतांना फोन

‘मुख्यमंत्री ठाकरेंचा एकेरी उल्लेख, सरकार काय करतंय’; पवारांचा राऊतांना फोन

शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी दै. सामनातील त्यांच्या रोखठोक या सदरामध्ये काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका वृत्त वाहिनीवर या संपूर्ण प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख ऐकून संजय राऊत यांना फोन केला. यासंबंधी त्यांनी नाराजी व्यक्त करत, एका मुख्यमंत्र्याचा असा एकेरी उल्लेख होणे, बरोबर नाही, असे म्हटले आहे.

काय म्हटले आहे ‘रोखठोक’मध्ये

सुशांत सिंह राजपूत या अभिनेत्याने आत्महत्या केली असे सकृत्दर्शनी दिसते. हा खून आहे असे जे वारंवार सांगितले जाते त्यास तसा आधार नाही. अभिनेत्याचा खून घडवून आणला व त्यात सिनेसृष्टी व राजकीय नेत्यांचे संगनमत आहे, असे ओरडून सांगणे हा तापलेल्या पोळ्या भाजू इच्छिणाऱ्या गटारी पत्रांचा व वृत्तवाहिन्यांचा प्रचार साफ खोटा होता. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. ते कसेही करून पाहायचे. पडत नाही म्हटल्यावर बदनाम करायचे असे विरोधकांनी ठरवले व भारतीय जनता पक्षाच्या सर्वच प्रकारच्या पाठिंब्यावर उभ्या राहिलेल्या वृत्तवाहिनीतून त्यांनी सुशांत प्रकरणात आघाडी उघडली. त्या वृत्तवाहिनीच्या प्रमुखाने केले ते ‘गॉसिपिंग’! लोकांच्या मनातील संशय वाढवला. अर्णब गोस्वामी हे रिपब्लिक वृत्तवाहिनीचे प्रमुख. ते राजकीय नेत्यांचा, मुख्यमंत्र्यांचा सरळ एकेरी भाषेत उल्लेख करतात, बदनामीकारक भाषा वापरतात, धमक्या देतात. सोनिया गांधींच्या बाबतीत त्यांनी हेच केले व आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी भाषेत उल्लेख करून आव्हानाची भाषा करतानाही त्यांना लोकांनी पाहिले. हे सर्व पाहिल्यावर श्री. शरद पवार यांनी मला फोन केला, “एका वृत्तवाहिनीवर उद्धव ठाकरे यांचा उल्लेख एकेरी भाषेत होतोय. हे बरोबर नाही. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री ही फक्त एक व्यक्ती नसते, तर संस्था असते.” ‘Institute’ असा उल्लेख त्यांनी केला. शेवटी त्यांनी प्रश्न केला, “मग सरकार काय करते?” पवार यांचे मत एका अनुभवी नेत्याचे मत आहे. पत्रकारितेचे हे चित्र चांगले नाही. एक वृत्तवाहिनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत गरळ ओकते व ते सहन केले जाते. त्या वृत्तवाहिनीस महाराष्ट्रातील राजकीय पक्ष बळ देतात. सुशांत सिंह हे निमित्त व त्या निमित्ताने सरकार बदनाम करायचे हे मुख्य कारस्थान. ते सुरूच आहे.


हे वाचा – Sushant Singh प्रकरणावर बिहारचे DGP गुप्तेश्वर पांडे बोलतात, महाराष्ट्राचे DGP सुबोध जयस्वाल गप्प का?


हाच तो व्हिडिओ जो ऐकून शरद पवार यांनी संजय राऊतांना केला फोन 


हेही वाचा – मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यामुळे महाराष्ट्राची नाचक्की?


दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरण मुंबई पोलिसांसह राज्य सरकारने सुरुवातीचे काही दिवस गांभीर्याने घेतले नाही. एका अभिनेत्याचा अपमृत्यू असताना ती केस हायप्रोफाईल करण्यासाठी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी खुली चौकशी (ओपन इन्क्वायरी) करण्यास मुंबई पोलिसांना भाग पाडल्यानेच मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कमालीचे नाराज झाल्याची खात्रीलायक माहिती आहे. मागील महिन्याभरात मुंबईत तीन छोट्या पडद्यावरील अभिनेते आणि अभिनेत्रींनी त्यांच्या राहत्या घरातच आपले जीवन संपवले आहे. त्यामुळे या तीन मृत्यूंचीही पोलीस आयुक्त परमबीर सिंह ओपन इन्क्वायरी करणार का? असा सवाल शिवसेनेच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने ‘आपलं महानगर’शी बोलताना केला होता. तसेच या प्रकरणाच्या तपासावरुन बिहार पोलीस आणि महाराष्ट्र तसेच मुंबई पोलीस आमने-सामने असताना बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे हे दररोज महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यपद्धतीवर खुलेआम ताशेरे ओढत आहेत. मात्र, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल गप्प का? जयस्वाल महासंचालक महाराष्ट्राचे आहेत की ते केंद्र सरकारच्या इशार्‍यावर गप्प आहेत, असा सवाल आता वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांमधून विचारला जात आहे. याबाबते वृत्त आपलं महानगरने दोन दिवसांपूर्वी दिले होते.

हेही वाचा –

संरक्षण मंत्र्यांची घोषणा : १०१ संरक्षण सामुग्रीची आयात करणार बंद

First Published on: August 9, 2020 12:00 PM
Exit mobile version