उशिरा का होईना पण घरांचे स्वप्न साकार

उशिरा का होईना पण घरांचे स्वप्न साकार

सिडको महागृहनिर्माण योजना अंतर्गत 14,838 सदनिकांची सोडत ऑक्टोबरमध्ये काढण्यात आली होती. या योजनेस नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. परंतु त्यावेळी ज्या नागरिकांना सोडतीमध्ये घरे प्राप्त झाली नव्हती अथवा काही कारणास्तव योजनेत सहभागी होता आले नव्हते अशा नागरिकांसाठी सिडको गृहनिर्माण योजना- 2019 च्या रूपाने पुन्हा सुर्वणसंधी चालून आली. सिडको महागृहनिर्माण योजना ऑगस्ट- 2018 मधील 1100 शिल्लक सदनिकांसाठी सिडकोतर्फे ‘गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली. या योजनेकरिताची सोडत गुरुवारी काढण्यात आली.

ही गृहनिर्माण योजना नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली, द्रोणागिरी या 5 नोड्समधील एकूण 11 ठिकाणी साकार होत आहे. एकूण 1100 सदनिकांपैकी 73 सदनिका या आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील तर उर्वरित 1027 सदनिका या अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी आहेत. आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील सदनिका केवळ प्रधानमंत्री आवास योजने अंतगर्त पात्र ठरणार्‍या अर्जदारांसाठी उपलब्ध आहेत. आर्थिकदृष्टया दुर्बल घटकासाठी उपलब्ध सदनिकांचे चटई क्षेत्रफळ 25.81 चौ.मी. आहे. तर अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध सदनिकांचे चटई क्षेत्रफळ 29.82 चौ.मी. आहे. आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी तळोजा येथे 39 व द्रोणागिरी येथे 34 सदनिका उपलब्ध आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी तळोजा येथे 650, खारघर येथे 59, कळंबोली येथे 53, घणसोली येथे 43 व द्रोणागिरी येथे 222 सदनिका उपलब्ध आहेत. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत अर्ज केलेल्या आर्थिकदृष्ठ्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना 2.5 लक्ष रुपयांचे अनुदान तर सीएलएसएसच्या माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांना रु. 2.67 लाख व्याज अनुदान प्राप्त होणार आहे.

First Published on: February 15, 2019 4:53 AM
Exit mobile version