अंध मुलांची शाळा बंद करण्यासाठी पालिकेचा तगादा

अंध मुलांची शाळा बंद करण्यासाठी पालिकेचा तगादा

मुंबई महापालिका

मालाड, मालवणी येथे पालिकेच्या शाळेत एक खासगी ट्रस्टकडून अंध मुलांची शाळा भाडेतत्वावर चालविण्यात येते, मात्र या शाळेने भाडे काही प्रमाणात थकवले असल्याचे कारण देत महापालिकेने शाळेची जागा खाली करण्याचा तगादा सदर ट्रस्टकडे लावला आहे. त्यामुळे या शाळेत शिक्षण घेणाऱ्या ६० अंध विद्यार्थ्यांना शिक्षणाला मुकावे लागणार असून त्यांना रस्त्यावर यावे लागणार आहे, अशी तक्रार भाजपच्या नगरसेविका योगिता कोळी यांनी पालिका शिक्षण समितीच्या बैठकीत केली आहे.

मुंबई महापालिकेचे पाणी बिलापोटी सत्ताधारी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी थकवल्याचे प्रकरण ताजे असताना दुसरीकडे मालाड, मालवणी येथे पालिकेच्या शालेय जागेत दोन वर्गात ६० अंध विद्यार्थी शिक्षण घेत असताना ट्रस्टने पालिकेचे भाडे थकवल्याने, या अंध शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणाऱ्या ट्रस्टला पालिका शिक्षण विभागाने वारंवार नोटिस बजावून सदर जागा खाली करण्यास सांगितले आहे. यासंदर्भातील विषय भाजपच्या नगरसेविका योगिता कोळी यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे शिक्षण समितीच्या बैठकीत उपस्थित केला होता.

भाडे भरण्यासाठी पुरेसा वेळ द्यायला हवा

एक सामाजिक ट्रस्ट जर ६० अंध मुलांना मोफत शिक्षण देत असेल आणि काही कारणास्तव त्या ट्रस्टने पालिकेचे भाडे थकवले असल्यास त्यांना भाडे भरण्यासाठी पुरेसा वेळ द्यायला हवा. त्याऐवजी पालिका अधिकारी हे या शाळेत शिकणाऱ्या अंध मुलांच्या भविष्याचा कोणताही गंभीर विचार न करता या शाळेची जागा खाली करू पाहत आहेत, असा आरोप नगरसेविका योगिता कोळी यांनी यावेळी केला.

…अन्यथा भाजपतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल

जर पालिकेला सदर जागा हवी असल्यास त्यांनी त्या ट्रस्टला अगोदर पर्यायी जागा द्यायला पाहिजे आणि मगच त्या शाळेला जागा खाली करण्यास सांगायला हवे, असे योगिता कोळी यांनी सांगितले. तसेच, सदर जागेत पालिका अधिकाऱ्यांना सध्याची शाळा पडून त्याऐवजी शाळेचा पुनर्विकास करावा, असे वाटत असले तरी केवळ भाडे थकवल्याने अंध विद्यार्थ्यांची शाळा बंद करून त्यांना रस्त्यावर आणू नये अन्यथा भाजपतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही योगिता कोळी यांनी दिला आहे.


हेही वाचा – कोरोना चाचण्यांच्या दरामध्ये सहाव्यांदा कपात – आरोग्यमंत्री


 

First Published on: December 15, 2020 10:17 PM
Exit mobile version