मुख्यमंत्री v/s राज ठाकरे; २४ एप्रिलला ईशान्य मुंबईत जुगलबंदी!

मुख्यमंत्री v/s राज ठाकरे; २४ एप्रिलला ईशान्य मुंबईत जुगलबंदी!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे

‘ए लाव रे व्हिडिओ’ची प्रचंड दहशत निर्माण करणार्‍या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जुगलबंदी उद्या, बुधवारी ईशान्य मुंबईत पहायला मिळणार आहे. महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारार्थ फडवणीस यांची घाटकोपरला तर आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची भांडुपमध्ये सभा होणार आहे.

आता मुंबईत सभांचा धडाका 

देशातील लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा मंगळवारी संपल्यानंतर महाराष्ट्रातील महायुती आणि आघाडीचे दिग्गज आता मुंबईसह चौथ्या टप्प्यातील निवडणूक प्रचारात सहभागी होणार आहेत. मंगळवारी दक्षिण मुंबईतील शिवडीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उत्तर मुंबईतील महायुतीचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या प्रचारासाठी सभा पार पडल्या. तर राजकारणातील भिष्माचार्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ईशान्य मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील यांच्या प्रचारासाठी गोवंडी बैगनवाडी येथे सभा पार पडली. तर ईशान्य मुंबईतील वंचित आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ घाटकोपरमध्ये एमआयएमचे ओवेसी यांची जाहीर सभाही पार पडली.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर राज ठाकरेंचे उत्तर

मात्र, बुधवार, २४ एप्रिल रोजी घाटकोपर पश्चिम येथील अमृतनगर जंक्शन येथे सायंकाळी साडेसहा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ईशान्य मुंबईतील भाजप उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा होत आहे. त्याच दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता ईशान्य मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारासाठी भांडुप पश्चिम येथील खडी मशिदीजवळ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे. मुख्यमंत्र्यांचे भाषण जरी वेळेवर सुरु होणार असले तरी राज ठाकरेंचे भाषण हे रात्री आठनंतरच सुरु होणार असल्याने मुख्यमंत्र्यांच्या टिकेला राज ठाकरे तिथेच उत्तर देणार आहे. एकाच मतदार संघात मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्या प्रचारसभा होत असल्याने सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

टिळक रोड नाक्यावर रुपालांचीही सभा

बुधवारी रात्री त्याच दिवशी साडेआठ वाजता टिळक रोड नाक्यावर केंद्रीय राज्यमंत्री पुरूषोत्तम रुपाला यांच्या सभेचे आयोजन मनोज कोटक यांच्या प्रचारासाठी करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपने आपली सर्व ताकद कोटक यांच्या प्रचारासाठी वापरली आहे. दरम्यान घाटकोपरमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अमित शहा यांची सभा तुर्तास रद्द झालेली असून पंकजा मुंडे यांच्यासह राज्यातील अनेक नेते ईशान्य मुंबईत हजेरी लावणार असल्याचे बोलले जात आहे.

नरेंद्र मोदी शुक्रवारी मुंबईत

मुंबईतील सहा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शुक्रवारी २६ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वांद्रे – कुर्ला संकूलात विराट जाहीर सभा होत आहे. या सभेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पंतप्रधानांसह उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री विरोधकांचा कसा समाचार घेतात याकडे सर्वच मुंबईचे लक्ष आहे.

First Published on: April 23, 2019 10:09 PM
Exit mobile version