रुग्णांसाठी आता ‘वैद्यकीय मदत मार्गदर्शक’ ग्रंथ; उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन!

रुग्णांसाठी आता ‘वैद्यकीय मदत मार्गदर्शक’ ग्रंथ; उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन!

उद्धव ठाकरेंनी शिवसेना वैद्यकीय मार्गदर्शन मदत ग्रंथाचं केलं प्रकाशन

सामान्यजनांचे आरोग्य उत्तम राहावे आणि त्यांना योग्य प्रकारे वैद्यकीय उपचारांचे मार्गदर्शन मिळावे या हेतूने ‘शिवसेना वैद्यकीय मदत मार्गदर्शक’ ग्रंथ तयार करण्यात आला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मंगेश चिवटे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा ग्रंथ साकारला आहे. यासाठी आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या सहकार्याने माहिती संपादित करून त्याचा अंतर्भाव या ग्रंथात करण्यात आला आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाण्यात झालेल्या कार्यक्रमामध्ये या ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं.

गरजू रुग्णांसाठी उपयुक्त ग्रंथ

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे आणि मंगेश चिवटे यांचं कौतुक केलं. ‘आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या समाजसेवकांसाठी तसेच नव्याने या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या व्यक्ती, संस्था, गोरगरीब गरजू रुग्ण किंबहुना समाजातील प्रत्येक घटकासाठी ‘वैद्यकीय मदत मार्गदर्शक’ हा ग्रंथ दिपस्तंभ ठरेल’, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी देखील या ग्रंथासाठी कौतुकपर अभिनंदन केलं. ‘बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या तत्वानुसारच आनंद दिघे यांच्या समाजकारणाचा वारसा एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत’, असं ते म्हणाले. तसेच, ‘वैद्यकीय मदत मार्गदर्शक’ समाजातील गोरगरीब गरजू रुग्णांसाठी दिशादर्शक आणि उपयुक्त ग्रंथ ठरेल’, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

या ग्रंथात कोणती माहिती मिळेल?

१) राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालये (चॅरिटी हॉस्पिटल)
२) राज्यातील सर्व महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत असलेली रुग्णालये
३) राज्यातील सर्व रक्त पेढ्या(ब्लड बँक)
४) गोरगरीब गरजू रुग्णांना मदत करणाऱ्या ट्रस्टची यादी
५) राज्यातील सर्व धर्मशाळांची यादी
६) राज्यातील सर्व अनाथ आश्रमं आणि बालकाश्रमांची यादी
७) गरजू रुग्णांनी प्रधानमंत्री सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी अर्ज कसा दाखल करावा? त्याची संक्षिप्त माहिती
८) सिद्धिविनायक ट्रस्ट आणि देणगी देणाऱ्या विविध ट्रस्टकडे आर्थिक मदत मिळवण्यासाठी अर्ज कसा दाखल करावा? त्याची संक्षिप्त माहिती
९) केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या आरोग्यविषयी विविध योजनांची माहिती
१०) राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाची (सिव्हिल हॉस्पिटल) / जिल्हा शल्यचिकित्सक यांची माहिती आणि संपर्क क्रमांक

First Published on: September 11, 2019 10:44 PM
Exit mobile version