शिवजयंतीच्या दिवशी मंत्रिमंडळाची बैठक, कोणता निर्णय होणार?

शिवजयंतीच्या दिवशी मंत्रिमंडळाची बैठक, कोणता निर्णय होणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय

महाराष्ट्र विकास आघाडीच्या ठाकरे सरकारने आपल्या कामांचा धुमधडाका सुरु केला आहे. नित्यनेमाप्रमाणे दर बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक होते. मात्र, उद्या शिवजयंतीची सुट्टी असल्यामुळे हा शिरस्ता मोडला जाणार असं वाटत होतं. मात्र, तो कायम ठेवत सुट्टीच्या दिवशी देखील मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट मीटिंग घेण्याचं जाहीर केलं आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या बैठकीमध्ये बुधवारी राज्य मंत्रीमंडळ नेमका कोणता निर्णय घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मंत्री बैठकीला कसे पोहोचणार?

मुंबईसह राज्यभरात बुधवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्ताने राज्य सरकारतर्फे सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र त्यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मंत्रीमंडळाची बैठक बोलविली असल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेक मंत्र्यांनी याविरोधात नाराजी व्यक्त केली होती. शिवजयंती निमित्त अनेक मंत्री त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात कार्यक्रमात व्यस्त असताना ही मंत्रिमंडळ बैठक बोलावण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे या मंत्रीमंडळ बैठकीला पोहचायचे कसे? हा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीला कोणकोण हजेरी लावते? हा उत्सुकतेचा मुद्दा ठरला आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाची रणनीती ठरणार?

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील जवळपास सर्वच मंत्री हे बुधावारी रायगडावर आयोजित खास कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. त्यानंतर दुपारी साडेचार वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रिमंडळ बैठकीसाठी परतणार आहेत. त्यांच्यासह इतरही अनेक मंत्री परततील, असे बोलले जाते. विशेष म्हणजे, राज्य विधी मंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ही मंत्रीमंडळ बैठक महत्वाची मानली जात असल्यानेच या बैठकीकडे सर्वांचे लक्ष आहे. बुधावारी दुपारी ४.३० वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली असून सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडणार असल्याची माहिती यावेळी मंत्रालयातील सूत्रांनी दिली.


हेही वाचा – काँग्रेसने माफी मागावी – देवेंद्र फडणवीस
First Published on: February 18, 2020 9:08 PM
Exit mobile version