गावितांच्या पक्षबदलावर टीका आणि स्वागत

गावितांच्या पक्षबदलावर टीका आणि स्वागत

सत्तेसाठी काँग्रेस, भाजप आणि आता शिवसेनेत प्रवेश करून लोकसभेचे तिकीट मिळवणार्‍या विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्या ‘पक्ष जाए पर कुर्सी न जाये’ या भूमिकेबद्दल त्यांच्या विरोधकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तर शिवसेनेकडून मात्र त्यांचे स्वागत केले जात आहे.

सार्वत्रिक निवडणुकीत पालघरची जागा भाजपने शिवसेनेला सोडल्यामुळे गावित यांची खुर्ची धोक्यात आली. त्यामुळे त्यांनी राजकारणात आवश्यक असणार्‍या सर्व क्लुप्त्यांचा वापर करून आता शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेनेही त्यांना शिवबंधन बांधताना निवडणुकीचे तिकीट लगोलग बहाल केले आहे. गेल्या दोन वर्षात तीन पक्ष बदलणार्‍या गावितांच्या या भुमिकेमुळे मात्र, पालघर जिल्ह्यातील राजकीय गोटात नाराजी व्यक्त होत आहे.

सत्तेसाठी गावित यांनी नितीमत्ता,आचार-विचार गहाण ठेवताना, भूमीपुत्रांचे प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. काँग्रेसमध्ये असताना भूमीपुत्रांच्या प्रश्नांवर त्यांनी भाजपावर टीका करून आंदोलनातही भाग घेतला होता. त्यानंतर ते भाजपच्या जवळ जावून बसले आणि आता खासदारही अबाधित रहावी यासाठी शिवसेनेच्या बंधनात गेले, अशी प्रतिक्रिया पर्यावरण संवर्धन समितीचे निमंत्रक समीर वर्तक यांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष तथा पालघर जिल्ह्यातील ज्येष्ठ शिवसैनिक शिरीष चव्हाण यांनी राजेंद्र गावित यांचे स्वागत केले आहे. एक शिवसैनिक म्हणून मी पक्षाच्या या निर्णयाचे स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

First Published on: March 28, 2019 4:06 AM
Exit mobile version