सलग तिसर्‍या पेपरमध्ये गोंधळ

सलग तिसर्‍या पेपरमध्ये गोंधळ

मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा लॉच्या विद्यार्थ्यांना फटका

लॉच्या तृतीय वर्षाच्या पाचव्या सत्राच्या सलग तिसर्‍या पेपरमध्ये गोंधळ झाला. बुधवारी झालेल्या तृतीय वर्षाच्या तिसर्‍या पेपरमधील चुकांमुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. या प्रकारामुळे विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा समोर आला आहे.

लॉ अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षाचा शनिवारी झालेला पहिला व सोमवारी झालेल्या दुसर्‍या पेपरमध्ये अनेक चुका झाल्या होत्या. त्यामुळे तिसरा पेपर व्यवस्थित असेल अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना होती. परंतु विद्यापीठाकडून पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ हा कित्ता गिरवण्यात आला. बुधवारी लॉचा तिसरा आयओएस पेपर होता. या पेपरमध्ये मराठी भाषेतील पेपरमध्ये चुका असल्याचे उघडकीस आले. विद्यार्थ्यांनी संपूर्ण पेपर सोडवल्यानंतर त्यांना दुरूस्ती असल्याचे सांगण्यात आले. पेपर संपण्यास 10 मिनिटे शिल्लक असताना परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना ही माहिती दिल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागाच्या कारभाराविरोधात असंतोष व्यक्त केला.

लॉसाठी सहा ते साडेसहा हजार विद्यार्थी आहेत. विद्यापीठ वारंवार चुकीचे प्रश्न देऊन विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळत असल्याचा आरोप स्टुंडट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी केला. परीक्षा विभागाकडून वारंवार चुका होत असूनही कुलगुरू त्याबाबत कोणतीही भूमिका मांडत नसल्याबद्दल सचिन पवार यांनी खंत व्यक्त केली.

First Published on: January 11, 2019 4:11 AM
Exit mobile version