ॐ पेट्रोलाय नमः। ॐ डिझेलाय नमः। ॐ डॉलराय नमः!

ॐ पेट्रोलाय नमः। ॐ डिझेलाय नमः। ॐ डॉलराय नमः!

सचिन सावंतांनी केला पेट्रोल दरवाढीचा निषेध

पेट्रोलचा दर नव्वदीपार व एक लिटर डिझेलची किंमत ८० रूपयांवर गेल्याने आता पेट्रोलपंपांना संरक्षण देण्याची वेळ आली असून, जनतेनेही लग्नात पेट्रोल, डिझेलचा आहेर देणे सुरु करावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे. राज्यात अगोदरच नव्वदी पार गेलेल्या पेट्रोलने आता मुंबई-ठाणे शहर व परिसरातही नव्वदी पार केली आहे. डिझेलचे दरही प्रति लिटर ८० रुपयांच्या वर गेले आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली आहे. याविरोधात मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी प्रतिकात्मक स्वरुपात काँग्रेस पक्षातर्फे ठाणे येथे अजब आंदोलन करण्यात आले. पितृपक्षाच्या पहिल्या दिवशी पेट्रोल, डिझेल आणि डॉलरची साग्रसंगीत पूजा अर्चा करण्यात आली!

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा मार सर्वसामान्य जनतेसह शेतक-यांनाही बसत आहे. त्यामुळे या बहिऱ्या सरकारचे कान उघडण्यासाठी काँग्रेस पक्ष सातत्याने संघर्ष करेल. आणि २०१९ ला राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली हीच गोरगरीब जनता सर्वसामान्यांचे सरकार आणेल.

सचिन सावंत, प्रवक्ते, काँग्रेस

ॐ पेट्रोलाय नमः!

दरम्यान, यावेळी काँग्रेसने पूजेसाठी विशेष मंत्रांचा जाप केला. ‘ॐ पेट्रोलाय नमः। ॐ डिझेलाय नमः। ॐ डॉलराय नमः।’ अशा मंत्रांचा जाप करत यावेळी काँग्रेसचे सचिन सावंत आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीबद्दल मोदी सरकारचा निषेध करत आंदोलन केलं. यावेळी मंत्रोच्चारातून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.

काय म्हणाले सचिन सावंत?

‘मोदींच्या नेतृत्वाखाली पेट्रोल लवकरच शंभरी पार करेल. मोदींच्या कर्तृत्वाने डिझेलच्या दराची वाटचालही शंभरीच्या दिशेने वेगात सुरू आहे. त्यामुळे आता पेट्रोलपंपांना संरक्षण तर द्यावे लागेलच, पण सोबतच पेट्रोल, डिझेलची पूजाही करावी लागेल’, अशा शब्दांत सचिन सावंत यांनी आपला निषेध व्यक्त केला. ‘सत्तेच्या उन्मादात मोदींना जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. आपल्या उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी सरकार चालवणा-या मोदींना सर्वसामान्य जनतेचा आक्रोश दिसत नाही’, असेही ते म्हणाले.


वाचा – ‘अफजल खान आणि उंदीर यांची गळाभेट होणार तर!’

First Published on: September 24, 2018 6:06 PM
Exit mobile version