काँग्रेस आघाडीचे उत्तर भारतीयांच्या मतांवर लक्ष्य

काँग्रेस आघाडीचे उत्तर भारतीयांच्या मतांवर लक्ष्य

विधानसभा निवडणुकीची घोषणा केव्हाही होऊ शकते, म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने जागा वाटपाची चर्चा जवळपास निश्चित झाली आहे. मात्र याआधीच दोन्ही काँग्रेस गळतीमुळे मुंबईसह राज्यभरात कमकुवत बनल्या आहेत. त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसू नये, याकरता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर भारतीयांच्या मतांवर लक्ष केंद्रीत करणार आहे. त्याकरता मुंबईतून किमान सहा ते सात उत्तर भारतीय उमेदवारांना तिकीट देण्यासंबंधी चाचपणी सुरु आहे, असे काँग्रेसच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरु केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीकडून सर्व इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण करुन झाल्यानंतर आता पहिली यादी देखील निश्चित केली आहे. कृपाशंकर सिंह हे काँग्रेसमधून बाहेर पडले, त्याचा उत्तर भारतीयांच्या मतांच्या रुपाने काँग्रेसला फटका बसू शकतो, म्हणूनही काँग्रेसने तात्काळ उपाययोजना सुरू केल्या आहेत. दोन्ही काँग्रेसकडून यंदा उत्तर भारतीयांना मुंबईतून तिकीट देण्याचा विचार सुरु आहे.

या जागा वाटपात प्रामुख्याने मागाठाणेमध्ये राष्ट्रवादीकडून हरिशंकर चव्हाण यांचे नाव चर्चेत असल्याची माहिती पुढे आली आहे. तर अणुशक्तीनगर येथे नवाब मलिक यांचे नाव चर्चेत आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसचाही अंधेरी पूर्व, कलिना, दहिसर, कांदिवली, चांदिवली आणि घाटकोपर वेस्ट या मतदारसंघातून उत्तर भारतीयांना संधी देण्याचा विचार आहे. तसेच कलिना, अंधेरी (पू.), वर्सोवा आणि भांडूप या मतदारसंघांची आदलाबदल करण्याचा विचार काँग्रेस करत आहे. सध्या उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. यात आम्ही मुंबईवर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. मुंबईतून सहा ते सात ठिकाणी उत्तर भारतीयांना उमेदवारी देण्याचा विचार सुरू असल्याचे काँगे्रसमधील एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

First Published on: September 17, 2019 1:43 AM
Exit mobile version