टक्केवारीसाठी वाटेल ते… – अभियंता ठाकरेंसह ठेकेदाराचा ‘तो’ फोटो चर्चेत

टक्केवारीसाठी वाटेल ते… – अभियंता ठाकरेंसह ठेकेदाराचा ‘तो’ फोटो चर्चेत

क्षुल्लक कामांकरता सामान्य नागरिकांना महापालिकेचे उंबरठे सातत्याने झिजवायला लावणारे महापालिकेचे अधिकारी ठेकेदारांना मात्र ‘व्हीआयपी’ ट्रिटमेंट देत चक्क ठेकेदाराच्या कागदपत्रांवर गाडीत बसून सह्या करत असल्याचे उघड झाले आहे. महापालिकेचे बांधकाम अभियंता एकनाथ ठाकरे व ठेकेदार गांवकर यांची ‘गाडी’तील ‘व्हीआयपी’ भेट सध्या अशीच चर्चेत आहे. या भेटीच्या व्हायरल फोटोमुळे महापालिकेतील ‘टक्के’वारी पुन्हा चर्चेत आली आहे.

वसई-विरार महापालिकेकडून निघणार्‍या प्रत्येक कंत्राटी कामात महापालिका अधिकार्‍यांची टक्केवारी असते, हे लपून राहिलेले नाही. महापालिका आयुक्तांपासून सहाय्यक आयुक्त व कनिष्ठ अभियंता यांना ‘खिरापत’ वाटावी लागत असल्याने नागरी कामांचा दर्जा राहत नसल्याचे स्पष्ट झालेले आहे. विशेष म्हणजे महापालिकेतील या निविदा आणि ठेकेदार नियुक्तीतील ‘मोनोपॉली’ ही वेळोवेळी उघड झालेली आहे. महापालिकेतील कित्येक अधिकारी आणि कर्मचारीच महापालिकेतील कित्येक ठेके दुसर्‍यांच्या नावाने घेत असल्याचे उघड झालेले आहे. तत्कालिन महापालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी अशा कित्येक ठेकेदारांना घरचा रस्ताही दाखवला होता. मात्र, त्यांची बदली होताच यातील कित्येक जण नव्या कंपनी नावांनी महापालिकेत सक्रिय झाले असल्याचे म्हटले जात आहे.

विद्यमान आयुक्त गंगाथरन डी. यांनीही मागील चार-सहा महिन्यांत ‘वजनाअभावी पडून’ असलेल्या कित्येक फाइल ‘हात ओले’ होताच ’मार्गी’ लावल्या आहेत. या फाईल मार्गी लागण्यासाठी संबंधित बांधकाम विभागाची शिफारस आणि शेरा महत्वाचा मानला जातो. त्यामुळेच महापालिकेत बांधकाम अभियंत्यांना महत्व आहे. प्रभाग ‘डी’चे अभियंता ठाकरे आणि ठेकेदार गांवकर यांची नुकतीच झालेली ‘गाडी’तील भेट याच उद्देशातून झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, ही भेट कार्यालयात होणे अपेक्षित असताना गाडीत का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे कार्यालयीन कागदपत्रांवर ठेकेदारासोबत ठाकरे सह्या करत असल्याचे फोटोतून समोर आले आहे.

गांवकर यांच्या ओमकार एंटरप्रायजेस कंपनीकडे शहरातील चेंबरवर झाकणे बसवण्याचा ठेका आहे. शहरातील चेंबरवरची तुटलेली झाकणे सध्या ‘बातम्यां’त आहेत. विशेष म्हणजे चार वर्षांपूर्वी विरार पूर्वच्या एका ठेकेदाराने गटारावरील चेंबरवर ‘बृहन्मुंबई महानगरपालिके’च्या नावाची झाकणे लावून आपल्या कामाचा प्रत्यय दिला होता. यावर महापालिकेने त्या ठेकेदाराकडे मुंबईतील गटारांच्या चेंबरवर झाकणे लावण्याचे काम आहे सांगून सामान्य नागरिकांच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचे काम केले होते. शिवाय आपल्याही जबाबदारीवर पांघरुन घालण्याचा प्रयत्न केला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर बांधकाम अभियंता ठाकरे व ठेकेदार गांवकर यांची ‘गाडी’तली ‘व्हीआयपी’ भेट सध्या चर्चेत आहे.

First Published on: December 24, 2021 5:00 AM
Exit mobile version