रुग्णवाहिके अभावी टॅक्सी, खासगी बस कोरोना रुग्णांच्या सेवेत

रुग्णवाहिके अभावी टॅक्सी, खासगी बस कोरोना रुग्णांच्या सेवेत

रुग्णवाहिके अभावी टॅक्सी, खासगी बस कोरोना रुग्णांच्या सेवेत

कल्याण डोंबिवलीत कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकांची उणीव भासू नये, तसेच रुग्णांना वेळेत रुग्णालयात दाखल करता यावे यासाठी टॅक्सी आणि खासगी कंपन्यांच्या मिनी बसेस यांचे तात्पुरत्या स्वरूपात रुग्णवाहिकेत रूपांतर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सुमारे ४० ते ४५ टॅक्सी बसेस कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सेवेत रुजू करण्यात आलेल्या असून रुग्णांची वाढती संख्या पाहता भविष्यात रुग्णवाहिकांच्या संख्येत वाढ करण्यात येईल, अशी माहिती कल्याण परिवहन विभागाचे आयुक्त ससाणे यांनी दिली.

ठाणे शहरासह कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर परिसरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने रुग्णांना ने-आण करण्यासाठी टॅक्सी आणि केडीएमसीच्या मिडी बस तसेच खासगी मिनी बसेस यांचे रुग्णवाहिकेत रूपांतर करण्यात आले आहे. कल्याण प्रादेशिक परिवहन विभागाने तात्पुरत्या स्वरूपात त्यांना मान्यता दिलेली असल्याची माहिती कल्याण प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी ससाणे यांनी आपलं महानगर शी बोलताना सांगितले. तसेच केडीएमसीच्या दोन मिडी बसेस आणि वैद्यकीय कर्मचारी यांना ने-आण करणाऱ्या ४ वाहने कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती केडीएमसी परिवहन विभागाचे अधिकारी खोडके यांनी दिली आहे.

केडीएमसीच्या रुग्णवाहिकाचे काम बघणारे अधिकारी सुरेश कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण प्रादेशिक परिवहन विभागाकडून सर्व औपचारिकता पार पाडून सुमारे ४०ते ४५ खाजगी वाहने (टॅक्सी आणि बस) रुग्णवाहिकेच्या रुपात केडीएमसीकडे आलेली असून काही खासगी कंपन्याच्या रुग्णवाहिका देखील कोरोना रुग्णासाठी केडीएमसीने ताब्यात घेतलेल्या आहेत. भविष्यात रुग्णवाहिकेच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता कदम यांनी वर्तवली आहे.
रुग्णवाहिकेत रूपांतर करण्यात आलेल्या टॅक्सीचा वापर करोना रुग्णासाठी करण्यात येणार असून खाजगी तसेच केडीएमसी च्या बसेस या करोना रुग्णाच्या संपर्कात आलेले नातेवाईक तसेच संशयित रुग्णांना विलगीकरण कक्ष येथे ने-आण करण्यासाठी करण्यात येणार असून ही सेवा पूर्णपणे मोफत असणार असल्याची माहिती केडीएमसीचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे.

First Published on: July 3, 2020 5:06 PM
Exit mobile version