झोपडपट्ट्यांमध्ये नाही तर सोसायट्यांमध्ये वाढला कोरोनाचा जोर

झोपडपट्ट्यांमध्ये नाही तर सोसायट्यांमध्ये वाढला कोरोनाचा जोर

अंधेरी पश्चिम आणि वर्सोवा विधानसभा क्षेत्र असलेल्या महापालिकेच्या के-पश्चिम विभागात दोन कोळीवाडे, गावठाण परिसर, गिल्बर्ट हिलसारख्या मोठ्या वस्तीसह अनेक झोपडपट्टींचा समावेश आहे. सुरुवातीपासून या विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आढळून येत आहे. सुरुवातीला काही इमारतींमधून सुरु झालेल्या या संसर्गाने मोठ्या लोकवस्तींमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे ही रुग्ण संख्या अनेक दिवस कायम राहिली. परंतु, आता झोपडपट्टी, गावठाण आणि कोळीवाड्यांमधील बाधित रुग्णांची संख्या कमी होऊन पुन्हा एकदा हा संसर्ग इमारती आणि सोसायटींमधून पसरु लागला आहे. मागील काही दिवसांमध्ये आढळून आलेल्या रुग्णांच्या संख्येनंतर प्रशासनाने झोपडपट्टीकडील लक्ष कमी करून इमारतींकडेच अधिक लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे.

के-पश्चिम विभागात ३३२२ रुग्ण

विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम या महापालिकेच्या के-पश्चिम विभागात आतापर्यंत ३३२२ एवढी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झालेली आहे. त्यातील १५९८ रुग्णांची प्रकृती बरी झाल्याने ते घरी परतले आहेत. तर १६३७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत २०८ रुग्णांचा मृत्यू झाला. या विभागातील सर्वांधिक रुग्ण हे गिल्बर्ट हिल परिसरात आढळून आले. मागील दोन महिन्यांपासून या विभागातील रुग्णांची संख्या कमी होत नाही. सातत्याने रुग्णांची संख्या वाढतच आहे. मात्र, त्यातुलनेत जुहू कोळीवाडा आणि वर्सोवा कोळीवाड्यातील प्रमाण बऱ्याच संख्येने कमी झालेले आहे. पार्ला गावठाणही थोडेफार नियंत्रणात आले आहे. मात्र, आनंद नगर, गणेश नगर आदी भागांमध्ये हे प्रमाण कायमच असून प्रशासनाला याठिकाणी हा संसर्ग रोखताना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

एप्रिल महिन्याच्या १४ तारखेला अवघ्या ८८ रुग्ण संख्या असलेल्या आणि कोरोनाग्रस्त वॉर्डाच्या यादीत आठव्या क्रमांकावर असलेल्या या विभागात रुग्णांची संख्या ३३००वर पोहोचली आहे. मुंबईतील सर्वच भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने मागील महिन्यांपर्यंत वरच्या क्रमांकावर असलेले वॉर्ड आता खालच्या क्रमांकावर येऊ लागले. मात्र, आता खालच्या क्रमांकावरील वॉर्ड वरच्या क्रमांकावर झेप घेताना दिसत आहे. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी आठव्या क्रमांकावर असलेला हा वॉर्ड आता चौथ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. मात्र, झोपडपट्टी, गावठाण आणि कोळीवाडा येथील कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण कमी होणे ही या वॉर्डाची जमेची बाजू आहे. परंतु, या विभागाने जोर धरल्यास लवकरच तिसऱ्या क्रमांकावर हा वॉर्ड दिसेल,असे सध्या या आकडेवारीवरून दिसून येते.

ऑक्सिजन रुपांतरीत खाटांची संख्या वाढवावी

विभागात आता रुग्णवाहिकांची संख्या वाढवण्यात आली असली तरी प्रत्यक्षात वाढत्या रुग्णसंख्येपुढे ही व्यवस्था कमी पडताना दिसत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ऑक्सिजन रुपांतरीत खाटांची संख्या वाढवण्याची मागणी होत आहे. तसेच अनेक झोपडपट्टयांमधील सार्वजनिक शौचालयांमधील सॅनिटायझेशनही अधिक वेळा करणे गरजेचे आहे. परंतु, एकूण या विभागाची भौगोलिक परिस्थिती पाहता हा विभाग एवढ्या सहजासहजी नियंत्रणात येणारा नसून प्रशासनाला यासाठी कोण कुठला नगरसेवक याऐवजी प्रत्येक रुग्ण आणि त्यापासून होणारा संसर्ग रोखणे हेच डोळयासमोर ठेवून काम करायला हवे. याचबरोबर नगरसेवक, आमदारांना विश्वासात घेवून आणि खासगी स्वंयसेवी संस्थांची मदत घेऊनच प्रशासनाला यावर मात करता येईल. याकडे प्रशासनाने अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

एकूण रुग्ण संख्या : ३३२२

बरे झालेले रुग्ण : १५९८

मृत्यू झालेले रुग्ण : २०८

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण : १६३७

जुहू कोळीवाडा, रोहिया नगर, पार्ला गावठाण आदी भागांमध्ये आता कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. आतापर्यंत १२५ हून अधिक रुग्णांची संख्या झाली आहे. सुरुवातीला महापालिका एक रुग्ण आढळून आल्यानंतर इमारतीत आणि वस्तीत सॅनिटायझेशन करायची. त्यानंतर अग्निशमन दलाच्यावतीने तेथील रस्त्यांवर सॅनिटायझेशन केले जायचे. परंतु, आता केवळ रुग्णाच्या घरातच सॅनिटायझेशन होते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जर सुरुवातीला ज्या पध्दतीचा वापर केला होता, तीच पद्धत पुढे सुरु असायला हवी. पण, तसे होत नाही. सर्वात मोठी समस्या म्हणजे रुगणवाहिकेचीच आहे.  – अनिष मकवानी, स्थानिक नगरसेवक,भाजप

गिल्बर्ट हिल परिसर, गंगालवडा, जुहू गल्ली आदी भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत असून माझ्या प्रभागात आतापर्यंत रुग्णांची संख्या ३९० एवढी झाली आहे. या विभागात रुग्णवाहिकेची मोठी समस्या आहे. मात्र, रुग्णवाहिका मिळाली तरी रुग्णालयात खाटेची व्यवस्था होत नसल्याने रुग्णलयांमध्ये फेऱ्या माराव्या लागतात. त्यामुळे विभागातील लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. माझ्या विभागात १२ ते १३ ताप तपासणी शिबिर घेण्यात आले आहे. सुरुवातील या शिबिरात लोक तपासणी करायला यायचे. परंतु, रुग्णालयात खाटा मिळत नाही, या भीतीने आता या शिबिरात एकही व्यक्ती तपासायला पुढे येत नाही. मागील काही तपासणी शिबिरांमध्ये ५ ते १० टक्के प्रतिसाद मिळाला आहे. अंधेरी स्थानकासमोर बीएसईएस हे रुग्णालय असून याठिकाणी कोविडसाठी महापालिकेने खाटांची व्यवस्था करावी म्हणून आपण प्रयत्न करत आहे, पण महापालिका प्रशासन याला दाद देत नाही.  – मेहेर हैदर, स्थानिक नगरसेविका, काँग्रेस

आतापर्यंत माझ्या प्रभागात ३०६ रुग्ण झाले असून त्यातील १०५ रुग्ण बरे होवून परतले आहे. तर ५ जणांचा मृत्यू झाला आहे. वर्सोवा कोळीवाडा, सात बंगला सागर कुटीर, जोसेफ पटेलवाडी आदी भागांमध्ये कोरेानाचे रुग्ण आढळून येत आहे. चालकांअभावी रुग्णवाहिका येण्यास विलंब होत असला तरी काही वेळाने ती उपलब्ध होते. महापालिका आपली कामगिरी चोख पार पाडत आहे. रुग्णांना खाटा मिळण्यास थोडाफार उशिर होत असल्याने महापालिकेने ऑक्सिजन रुपांतरीत खाटा तयार करून प्राथमिक उपचाराची व्यवस्था केल्यास अनेक रुग्ण बरे होण्यास मदत होईल. आतापर्यंत विभागात ३५ वैद्यकीय शिबिर घेवून एकूण ७५०० लोकांची तपासणी केली आहे.तसेच खासगी डॉक्टरांची बैठक घेवून पावसाळ्यातील साथीच्या आजारांवर कशाप्रकारे नियंत्रण ठेवता येइल याचीही खबरदारी घेतली जात आहे.  – प्रतिमा खोपडे, स्थानिक नगरसेविका,शिवसेना

माझ्या विभागात आतापर्यंत १५० हून अधिक कोरेानाचे रुग्ण आढळून आले आहे. परंतु आज या विभागात रुग्णवाहिकेचीच मोठी समस्या आहे. आणि रुग्णांना वेळीच दाखल करता येत नाही. त्यामुळे अनेक रुग्ण घाबरुन जातात. खूप मुश्किलीने रुग्णालयात त्यांना खाट उपलब्ध होते. परंतु कोविड रुग्णांबरोबरच नॉन कोविड रुग्णांवर उपचार करणे हीसुध्दा मोठी समस्या बनली आहे त्यामुळे कोविड आणि नॉन कोविडच्या रुग्णांना रुग्णालया दाखल करेपर्यंत नगरसेवक हैराण होवून जातात. आतापर्यंत विभागात ताप तपासणी शिबिर राबवून संशयित रुग्णांचा शोध घेतला जातो.  – रोहन राठोड, स्थानिक नगरसेवक, भाजप

आनंद नगर, गणेश नगर आदी भागांसह इतर ठिकाणी आतापर्यंत १५०हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, महापालिकेच्यावतीने पाठवण्यात येणारी अन्नाची पाकिटे योग्य दर्जाची नसतात. रुग्णालयात खाटा उपलब्ध होत नाही, ही समस्या असली तरी प्रशासनातील असमन्वयाच्या अभावामुळे हा प्रकार घडत आहे. १९१६ वर खाट उपलब्ध असल्याचे सांगितले. परंतु जेव्हा रुग्णाला रुग्णवाहिकेतून तिथे नेले जाते, तेव्हा तिथे खाट रिकामी नसते. रुग्ण जाईपर्यंत तिथे दुसरा रुग्ण दाखल झालेला असतो. त्यामुळे ज्या रुग्णाच्या नावावर खाट बुकींग झाल्यास अशी समस्या उद्भवणार नाही. तसेच विभागात कोणत्या रुग्णालयात किती खाटा रिकामी आहेत, हे विभागातील नगरसेवकांना सहायक आयुक्त किंवा विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कळवल्यास प्रत्येक लोकप्रतिनिधींना याची कल्पना येईल आणि त्याप्रमाणे ते आपल्या विभागातील रुग्णांना तिथे दाखल करण्याचा प्रयत्न करतील.  – राजुल पटेल, स्थानिक नगरसेविका, शिवसेना


हेही वाचा – पॉझिटिव्ह अहवाल येताच कोरोना रुग्णाने काढला पळ


 

First Published on: June 15, 2020 7:08 PM
Exit mobile version