पॅथलॅबचा कर्मचारी निघाला सुपर स्प्रेडर, डझनभर लोकांना Covid-19 संसर्ग

पॅथलॅबचा कर्मचारी निघाला सुपर स्प्रेडर, डझनभर लोकांना Covid-19 संसर्ग

मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना दादरमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दादरमध्ये चाचणी करणाऱ्या लॅबमध्येच कोरोनाचा शिरकाव झाला आहे. लॅबमध्ये काम करणाऱ्या एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने १२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना पॉझिटव्ह आलेला रुग्ण हा दादर पश्चिम येथे असलेल्या डॉ. लालपत पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम करत होता. शनिवारी त्याची कोरोना चाचाणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या लॅबमधील इतर स्टाफची कोरोना चाचणी केली असता एकूण १२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. १२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे ट्रेसिंग करण्यात येत आहे. संपूर्ण लॅब कोरोनाच्या विळख्यात आल्याने पालिकेकडून लॅब सील करण्यात आली आहे.

डॉ. लालपत पॅथॉलॉजी लॅबमध्ये आढलेल्या १२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची ओमिक्रॉन चाचणी देखील करण्यात आली असून त्यांचे सॅम्पल्स जिनोम सिक्वेनिंससाठी पाठवण्यात आले आहेत. मुंबईत सध्या कोरोना तसेच कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईत शुक्रवारी ११ ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ख्रिसमस सेलिब्रेशन आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे.

मुंबईसह राज्यात २५ डिसेंबरच्या रात्रीपासून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री ९ ते सकाळी ६ या काळात पाच पेक्षा जास्त लोक एकत्र आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे सामाजिक, राजकीय तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी केवळ १०० लोकांना परवानगी असेल. तर खुल्या जागेत कार्यक्रम करण्यासाठी २५० लोकांना परवानगी असेल.


हेही वाचा – Cororna Virus: राज्यात रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत जमावबंदी लागू, अनिल परब यांची विधानसभेत माहिती

First Published on: December 25, 2021 9:17 AM
Exit mobile version