Corona: ठाणेकरांना जीवनावश्यक वस्तू मिळणार घरपोच!

Corona: ठाणेकरांना जीवनावश्यक वस्तू मिळणार घरपोच!

संचारबंदीच्या काळात नागरिकांनी किराणा, भाजीपाला आणि औषध खरेदीसाठी घराबाहेर पडू नये यासाठी शहरातील विक्रेत्यांकडून जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. http://essentials.thanecity.gov.in/ या वेबसाईटवरून नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त विजय सिंघल यांनी केले आहे. कोरोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी शासनाने जाहिर केलेल्या संचारबंदी कालावधीत ठाणे शहरात प्रमुख ठिकाणी नागरिकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी आता ठाणे महानगरपालिकेच्या योजनेनुसार किराणा, भाजीपाला आणि औषधांची घरपोच डिलीव्हरी विक्रेत्यांकडून करण्यात येणार आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या डिजीठाणे बनवलेल्या या वेबसाईटला भेट देऊन दिलेल्या यादीतील दुकानदारांकडे नागरिकांनी संपर्क साधून आपल्याला हव्या असणाऱ्या वस्तूंची मागणी करता येईल, असे पालिकेने स्पष्ट केलं आहे. कोरोना प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी लॉकडाऊन कालावधीत नागरीकांची घरबसल्या जीवनावश्यक वस्तूंची गरज लक्षात घेऊन ठाणे महानगरपालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या संकल्पनेतून हे विशेष संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. त्यास संबंधित व्यावसायिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. महापालिकेच्यावतीने ११४५ दुकानदारांची यादी त्यांच्या मोबाईल नंबरसह प्रसिद्ध केली आहे. यावेळी गरज पडल्यास या कामात महानगरपालिकेचे अधिकारी समन्वयकाची भूमिका पार पाडतील अशा सूचनाही आयुक्त सिंघल यांनी दिल्या आहेत.

योग्य किंमतीत वस्तू घरपोच मिळणार

ग्राहकांनी आपल्याला आवश्यक असलेली वस्तूंची मागणी नोंदविल्यानंतर विक्रेता संबंधित ग्राहकास त्याच्या वस्तू योग्य किंमतीत घरपोच करेल. घरपोच डिलीव्हरी केलेल्या कर्मचाऱ्यांशी कोणत्याही प्रकारचा संपर्क होणार नाही याचीही दक्षता विक्रेत्यांच्यावतीने घेण्यात येणार आहे. विक्रेत्यांनी घरपोच डिलीव्हरी केलेले पदार्थ हाताळण्याबाबत योग्य दक्षता घेण्याचे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. प्रभाग आणि परिसरनिहाय व्यावसायिकांची संबंधित यादी शहरातील विविध व्हाट्सअप ग्रुपवरसुद्धा प्रसिध्द करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील विक्रेते, व्यावसायिकांनी घरपोच सेवा देण्याच्या या सुविधांमुळे नागरिकांना मोठी मदत होणार आहे. यामुळे प्रत्यक्ष बाजारांच्या आवारात होणारी गर्दी कमी झाल्याने कोरोनाबाबत योग्य ती खबरदारी घेणे सोयीचे होणार आहे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.


मुंबईचा भाजीपाला पुरवठा आटणार? एपीएमसी मार्केट शनिवारपासून बंद!
First Published on: April 9, 2020 7:54 PM
Exit mobile version