वाढदिवसा दिवशीच नगरसेविका कोरोना पॉझिटिव्ह

वाढदिवसा दिवशीच नगरसेविका कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई महापालिकेच्या अनेक नगरसेवकांना कोरोनाची बाधा होत असून भाजपच्या मुलुंडमधील नगरसेविका रजनी केणी आणि त्यांचे पती व मुलाला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे रजनी केणी यांचा गुरुवारी ९ जुलै रोजी वाढदिवस होता. पण त्याच दिवशी त्यांचा कोरोनाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, त्यांनी खासगी रुग्णालयात जावून उपचार घेण्याऐवजी मिठानगर शाळेतील कोरोना केअर सेंटरमध्ये जावून उपचार घेण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे खासगीपेक्षा मला महापालिकेच्या कोरेाना केअर सेंटरमधील उपचारावर जास्त विश्वास असल्याचे केणी यांनी स्पष्ट केले.

मुलुंड येथील प्रभाग क्रमांक १०५ च्या नगरसेविका रजनी केणी यांना मागील दोन दिवस कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने त्यांनी आपल्यासह पती नरेश केणी आणि मुलगा नमित केणी यांची कोरोना चाचणी केली होती. या चाचणीचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाल्यानंतर रजनी केणी या पती व मुलासह मिठा नगर शाळेतील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झाल्या. मार्च महिन्यापासून कोविडचा संसर्ग झाल्यानंतर रजनी केणी विभागातील जेवणाची पाकिटे वाटप, सॅनिटायझर वाटप तसेच विभागात निजंर्तुकीकरण करण्यासह सक्रीय होत्या. मात्र, दोन दिवसांपासून त्यांना ही लक्षणे आल्याने त्यांनी ही चाचणी करून घेतली.

विशेष म्हणजे गुरुवारी ८ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस असतो. परंतु त्याच दिवशी त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने वाढदिवशी दिनीच त्यांना उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावे लागले. आजवर कोरोनाची बाधा झालेले नगरसेवक व लोकप्रतिनिधी हे खासगी रुग्णालयात दाखल होत असताना केणी कुटुंबाने महापालिकेच्याच कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होण्याचा निर्णय घेतला. आजवर याठिकाणी १०० हून अधिक रुग्णांना दाखल केले होते. आणि सर्वांनी येथील सुविधा अप्रतिम असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आपण जर खासगी रुग्णालयात दाखल झालो तर सामान्य माणसाचा विश्वास उडेल, याच भावनेतून मी माझ्या कुटुंबासह इथे दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले.

यापूर्वी माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर व त्यांचे पती हरिष वरळीकर, नगरसेवक विजेंद्र शिंदे, भाजप नगरसेविका सुरेखा लोखंडे आणि त्यांचे पती रोहिदास, नगरसेविका अश्विनी हांडे आणि त्यांचे पती बाबा हांडे, नगरसेवक दत्ता पोंगडे आदींसह अनेक नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबाला कोरोनाची बाधा झाली होती.


हेही वाचा – ‘राजगृह’ तोडफोड प्रकरणी एकाला अटक, दुसऱ्याचा शोध सुरु


 

First Published on: July 9, 2020 11:47 PM
Exit mobile version