दक्ष नगरसेवक, पोलिसांमुळे महिलांसाठी कॉटनग्रीन स्कायवॉक परिसर रात्रीही सुरक्षित

दक्ष नगरसेवक, पोलिसांमुळे महिलांसाठी कॉटनग्रीन स्कायवॉक परिसर रात्रीही सुरक्षित

दक्ष नगरसेवक, पोलिसांमुळे महिलांसाठी कॉटनग्रीन स्कायवॉक परिसर रात्रीही सुरक्षित

काही दिवसांपूर्वी साकिनाका येथे मध्यरात्रीच्या सुमारास एका महिलेसंदर्भात झालेल्या गंभीर घटनेपासून महिलांसाठी अंधारमय, सुनसान जागा, निर्जन स्थळ हे धोकादायक ठरू लागले आहेत. शिवसेनेचे जागरूक नगरसेवक सचिन पडवळ यांनी, कामानिमित्त घराबाहेर असताना ‘काॅटनग्रीन स्कायवॉक’वरून ये – जा करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेबाबत केलेल्या पत्रव्यवहाराची तातडीने दखल घेऊन स्थानिक पोलिसांची रात्री उशिरापर्यंत गस्त सुरू करण्यात आली आहे.
त्यामुळे या परिसरातील तरुणी, महिलांसाठी ही बाब दिलासादायक ठरत आहे. महिला वर्गाकडून नगरसेवक सचिन पडवळ व सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मुळे यांचे व गस्त घालणाऱ्या पोलीस पथकाचे कौतुक करण्यात येत आहे.

यासंदर्भात, नगरसेवक सचिन पडवळ यांच्याकडे विचारणा केली असता, सध्या काही समाजकंटक, गर्दुल्ले, गुंड प्रवृत्तीचे लोक आदींच्या समाजविघातक कारवायांमुळे रात्री, अपरात्री कामांवरून अथवा अन्य कारणास्तव घराबाहेर पडलेल्या तरुणी, महिला यांना घरी पतताना काहीशी असुरक्षितता वाटते. त्यामुळे काही ठिकाणी महिला वर्ग जरा घाबरून वावरत आहेत.

या सर्व घटनाप्रकाराची आम्ही गंभीर नोंद घेतली व तरुणी, महिलांच्या व एकूणच मानव जातीच्या सुरक्षिततेबाबत कडक उपाययोजना करण्याचा निर्धार व्यक्त केला. विषेशतः महिलांबाबत तर ‘ तुमची सुरक्षा हिच आमची जबाबदारी’ असा वसा आम्ही घेतला.

आमच्या प्रभाग क्रमांक २०६ मधील ‘काॅटनग्रीन स्कायवॉक’ येथे दिवसभरात मोठ्या प्रमाणात तरुणी, महिला, नागरिक यांची रहदारी असते. मात्र हल्ली समाजात तरुणी, महिलांबाबत घडत असलेल्या दुर्दैवी घटना पाहता महिलांच्या सुरक्षिततेबाबत कडक उपाययोजना करण्याचा आम्ही निर्णय घेतला, असे नगरसेवक सचिन पडवळ यांनी सांगितले.

काही महिलांनी ‘काॅटनग्रीन स्कायवॉक’ परिसरात गर्दुल्ले यांचा वावर वाढल्याचे सांगत सुरक्षिततेबाबत समस्या असल्याचे आम्हाला सांगितले. त्यांची ही महत्वाची समस्या मार्गी काढण्यासाठी आम्ही सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मुळे यांची भेट घेऊन ‘काॅटनग्रीन स्कायवॉक’ परिसरात रात्री उशिरापर्यंत पोलीस गस्त घालण्याची व सुरक्षा व्यवस्था कडक करण्याची मागणी केली. त्यास पोलिसांकडून अनुकूल व सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला.

काळाचौकी पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीमती संगीता पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.मुळे यांच्या आदेशाने स्थानिक पोलिसांनी अवघ्या २४ तासात ‘काॅटनग्रीन स्कायवॉक’ परिसरात सायंकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत गस्त घालायला सुरुवातही केली. त्यामुळे आता महिलांना घाबरण्याचे अथवा भीती बाळगण्याचे कारण नाही, असे नगरसेवक सचिन पडवळ यांनी सांगितले.


हेही वाचा – हर्बल तंबाखूच्या लागवडीला परवानगी द्या!

First Published on: October 19, 2021 7:57 PM
Exit mobile version