घरताज्या घडामोडीहर्बल तंबाखूच्या लागवडीला परवानगी द्या!

हर्बल तंबाखूच्या लागवडीला परवानगी द्या!

Subscribe

सदाभाऊ खोत यांचे शरद पवारांना पत्र

मुंबई ड्रग्स प्रकरणावरून राज्यातील राजकारण सध्या चांगलेच तापल्याचे पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांमध्ये या प्रकरणात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशावेळी माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एक खोचक पत्र लिहिलं आहे. ‘हर्बल तंबाखूच्या लागवडीला परवानगी द्या’, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांकडे केली आहे.

आपल्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार काम करीत आहे. कोरोना काळात कसाबसा टिकून राहिलेला शेतकरी अतिवृष्टी, चक्रीवादळ आणि महापूर अशा अस्मानी संकटात सापडून मरणप्राय वेदना भोगत आहे. आपल्यासारखे शेतीतील जाणते गुरू असूनही महाविकास आघाडी सरकारने आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांना तुटपुंजी मदत केल्याने अनेक शेतकरी गळफास लावून आत्महत्या करत आहेत. शेती अक्षरशः परवडेनाशी झाली आहे.

- Advertisement -

सरकार मदत करत नाही हे बघून अनेक शेतकर्‍यांना गांजासारखे पीक घ्यावे असे वाटू लागले आहे. गांजा ही एक जगात कायम मागणी असलेली वनस्पती (हर्बल) आहे. म्हणूनच सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापूर गावातील अनिल बाबाजी पाटील या शेतकर्‍याने आपल्या शेतात या मौल्यवान हर्बलची (वनस्पतीची) लागण करण्याची मागणी केली आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातील अनेक शेतकर्‍यांना या मौल्यवान हर्बलची (वनस्पती) शेती करायची आहे.

राज्यात गांज्यासारख्या मौल्यवान हर्बलची लागवड करायची असल्यास सरकारची परवानगी लागते. जी सहजासहजी मिळत नाही; पण अलिकडे आपल्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील एक वरिष्ठ मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाकडे मौल्यवान हर्बल तंबाखू सापडल्याचे आपण सांगितले आहे. नवाब मलिक यांचे जावई या मौल्यवान हर्बल तंबाखूतून श्रीमंत झाल्याचे पाहून महाराष्ट्रातील अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना आशेचे किरण दिसू लागले आहेत. तरी आपणास नम्र विनंती आहे की या हर्बल तंबाखूच्या लागवडीसाठी आसुसलेल्या शेतकर्‍यांना आपण तात्काळ परवानगी मिळवून द्यावी. जेणेकरून महाराष्ट्रातील गरीब शेतकरी व कष्टकरी शेतमजूर नवाब मलिक यांच्या जावयासारखा श्रीमंत होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -