रेल्वे स्थानकात जमावबंदी; गर्दी करणाऱ्यांवर ठेवणार नजर

रेल्वे स्थानकात जमावबंदी; गर्दी करणाऱ्यांवर ठेवणार नजर

जगात धुमाकूळ घालणाऱ्या करोना व्हायरसने आता महाराष्ट्रात हात पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. हा करोना व्हायरस आता मुंबईत येऊन दाखल झाला आहे. त्यामुळे मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे आणि आता त्यापाठोपाठ करोनाचा प्रसार रोखण्यासाठी रेल्वे स्थानकातही जमावबंदी लागू करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रेल्वे स्थानक हद्दीत प्रवाशांची विनाकारण गर्दी दिसली तरी कारवाई केली जाणार आहे, असा इशारा मध्य रेल्वेने दिला आहे. तसेच गर्दी करणाऱ्यांवर सीसीटीव्हीमार्फत करडी नजर ठेवण्यात येणार आहे.

यासाठी घेण्यात आला निर्णय

करोनाचा प्रसार गर्दी असलेल्या ठिकाणी होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, लोकल आणि मेल – एक्स्प्रेस स्थानकावर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे रेल्वे स्थानकावर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच लोकल आणि मेल – एक्स्प्रेस गाड्यांच्या स्वच्छतेवर रेल्वे प्रशासनाने भर दिला आहे. त्यामुळे जर एखादी व्यक्ती अस्वच्छता करत असेल तर त्या व्यक्तीवर देखील कारवाई केली जाणार आहे.

अशी दूर केली जाणार गर्दी

बऱ्याचदा रेल्वे स्थानकावर ग्रुप करुन गप्पा मारल्या जातात. तसेच अनेक तरुण वर्ग वायफायकरता रेल्वे स्थानकावर येऊन बसतात. त्यामुळे दोन प्रवासी असो किंवा त्यापेक्षा अधिक प्रवासी विनाकारण बसलेले आढळल्यास सुरक्षा दल, स्टेशन मास्तरकडून हटकले जाणार आहे. त्याचप्रमाणे एखादा प्रवासी बराच वेळ एका ठिकाणी बसलेला आढळल्यास त्याच्याकडे कर्मचाऱ्यांना पाठवून त्यांना बाहेर जाण्यास सांगितले जाईल, असे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले आहे.


हेही वाचा – राज्यात स्टेज-२ चा करोना!


 

First Published on: March 17, 2020 8:28 AM
Exit mobile version