Dabbawala Bhawan : वांद्रे येथे उभारणार ‘डबेवाला भवन’ – यशवंत जाधव

Dabbawala Bhawan : वांद्रे येथे उभारणार ‘डबेवाला भवन’ – यशवंत जाधव

Dabbawala Bhawan At Bandra :  मुंबईतील काही दुकानदार, व्यापारी, नोकरदार यांच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था पावसापाण्यातही वेळेत करणाऱ्या डबेवाल्यांसाठी हक्काचे विश्रामस्थान, आश्रयस्थान म्हणजे “डबेवाला भवन” हे वांद्रे विभागात लवकरच उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेकडून २८६.२७ चौ.मी. इतकी जागा उपलब्ध करण्यात येत आहे, अशी माहिती पालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली आहे.

मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी, डबेवाला भवन उभारण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेने उचललेल्या पावलावर डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी, खूप आनंद व्यक्त केला. तसेच, त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचे आणि महापौर किशोरी पेडणेकर यांचेही आभार मानले आहेत. आता डबेवाला भवन लवकरात लवकर साकार होईल, अशी मनीषा त्यांनी व्यक्त केली. तळेकर हे सातत्याने डबेवाला भवन होण्यासाठी सतत पाठपुरवठा करत आहेत.

मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेने मुंबईची जगभरात ओळख करून देणाऱ्या व व्यापारी, दुकानदार, नोकरदार यांना वेळेत जेवणाचा डबा पोहोचविणाऱ्या डबेवाल्यांना हक्काचे आश्रय स्थान, विश्राम स्थान उपलब्ध करून देण्याबाबतचे आश्वासन वचननाम्याद्वारे दिले होते. मात्र त्याची पूर्तता यंदाची दुसरी निवडणूक तोंडावरती आल्यानंतरही करण्यात आलेली नव्हती. तसेच, यंदाच्या अर्थसंकल्पात पालिकेने डबेवाला भवनासाठी कोणतीही तरतूद केलेली नव्हती, असा आरोप करीत भाजपने सत्ताधारी शिवसेनेला टार्गेट केले होते.

सदर डबेवाला भवन उभारण्यासाठी पालिकेने एक – दोन ठिकाणी जागा बघितल्या होत्या. मात्र आता वांद्रे येथील एका प्रशस्त अशा जागेवर हे “डबेवाला भवन” उभारण्यात येणार आहे. वास्तविक, शिवसेनेच्या नगरसेविका व आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी, मुंबईत “डबेवाला भवन ” उभारण्यासाठी पालिका आयुक्त यांच्याकडे मागणी केली होती. ७ मार्च २०१९ रोजी याबाबत एक ठराव मांडला होता. त्यास काँग्रेसचे नगरसेवक सुफियांन वणू यांनी अनुमोदन दिले होते.
मात्र पालिका विकास आराखड्यात डबेवाला भवन साठी जागा उपलब्ध नसल्याचे कारण देत सत्ताधारी शिवसेनेची बोळवण केली होती.

नंतर याबाबत पालिका बैठकीत प्रशासनाने समाज कल्याण केंद्रासाठी आरक्षित इमारतीमध्ये काही प्रमाणात जागा देण्याचा आणि खासगी जागा अथवा अनारक्षित भूखंडाचा पर्याय सुचवला आहे. आता वांद्रे येथे डबेवाला भवन उभारण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे.


हेही वाचा – सार्वजनिकरीत्या पुरुषाला नपुंसक बोलणे लाजिरवाणे; कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

First Published on: February 11, 2022 9:32 PM
Exit mobile version