पावसाळ्यात दहिसरकरांची घरं पाण्यानं भरणार? नदीपात्रात भराव अजूनही पडून!

पावसाळ्यात दहिसरकरांची घरं पाण्यानं भरणार? नदीपात्रात भराव अजूनही पडून!

नदीपात्रात भराव अजूनही पडून

मुंबईतील सर्व नदी आणि नाल्यांच्या सफाईचे काम युद्धपातळीवर सुरु असले तरी दहिसर नाल्याच्या पात्रात महापालिका आणि मुंबई मेट्रोच्या विकास कामांचा भराव पडलेला आहे. पावसाळा काही दिवसांवर आलेला असतानाही नदीच्या या पात्रात भराव अद्यापही महापालिका तसेच मुंबई मेट्रोने न काढल्याने ऐन पावसाळ्यात या नदीच्या पात्रातील पाण्याच्या प्रवाहात मोठा अडसर निर्माण होऊन दहिसरकरांच्या घरात पाणी जाण्याची भीती वर्तवली जात आहे.

दहिसर नदीच्या प्रवाहात अडथळा

दहिसर नदीच्या पात्रात मुंबई मेट्रो रेल्वेसाठी उभारण्यात आलेल्या मार्गाचा खांब असून या खांबासाठी खोदलेला भराव नदीच्या पात्रातच पडून आहे. तसेच महापालिकेच्यावतीने नदीच्या पात्रावर पुलाची उभारणी केली जात आहे. त्यामुळे अगदी १०० मीटरच्या क्षेत्रातच नदीच्या पात्रात या दोन्ही कामांचे भराव पडलेले आहेत.

शिवसेना उपनेते आणि म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी नगरसेविका तेजस्वी घोसाळक तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह दहिसरमधील नदी आणि नाल्यांची पाहणी केली. या पाहणी दरम्यान, ही बाब निदर्शनास आली. यावेळी अनेक नाल्यांमधील गाळ तसेच दहिसर नदीच्या पात्राची सफाई तसेच विकासकामांचा भराव हटवलेला नसल्याने त्यांनी पर्जन्य जलविभागाच्या अधिकाऱ्यांना या नदीच्या प्रवाहातील गाळ काढण्याचे निर्देश दिले. मेट्रोच्या कामांमुळे दहिसर नदीत करण्यात आलेला भराव त्वरित हटविण्याची मागणी करत त्यांनी मान्सूनपूर्व दहिसर परिसर जलमय होणार नाही याची काळजी घेण्याची सूचनाही अधिकाऱ्यांना केली. घोसाळकर यांनी दहिसर नदी परिसराची पाहणी केल्यानंतर गणपत पाटील नगर ते थेट दहिसर चेक नाका परिसरापर्यंत नाल्याची पाहणी केली. यावेळी पर्जन्य जलवाहिनी विभागाचे सहाय्यक अभियंता अमोल गावित, निनाद कुलकर्णी, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर उपस्थित होते.


हेही वाचा – महिलेच्या प्रसूतीनंतर केले आईवर अंत्यसंस्कार; कल्याणमधील डॉक्टरचा हृदयस्पर्शी प्रसंग


First Published on: May 31, 2020 7:19 PM
Exit mobile version