धाक ! ते काय असते भाऊ?

धाक ! ते काय असते भाऊ?

mobile theft

पोलिसांचा गुन्हेगारांना धाक असेल तरच गुन्हेगारीला आळा किंवा त्यावर नियंत्रण येऊ शकते, परंतु शहरात पोलीस स्थानकाच्या परिसरात गुन्हेगारी वाढली आहे. उल्हासनगर शहरातील हिललाईन पोलीस ठाण्यासमोर मोबाईल मागण्याच्या कारणावरून तीक्ष्ण हत्याराने चार जणांच्या टोळीने तिघांवर वार केले, तर अंबरनाथ पोलीस ठाण्यासमोर एका तरुणाचा मोबाईल आणि रोख रक्कम लुटून त्याला गटारात पाडून मारहाण करण्यात आली. पोलीस ठाण्यासमोरच असे प्रकार घडू लागल्याने कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असल्याचे चित्र या दोन्ही शहरांत दिसून येत आहे .

उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यापासून अंतरावर एका टोळीने तीक्ष्ण हत्याराने 3 जणांवर वार केले . काल सायंकाळी 5 वाजता दीपक चव्हाण (25) व त्याचा मित्र अजित अलिम शेख, हे दोघे जण मोटारसायकलवरून जात असताना त्यांना ऋतिक तेजी याने थांबवले आणि त्याने दिपकचा मोबाईल मागितला. दिपकने मोबाईल देण्यास नकार देतात त्याच्या डोक्यावर ऋतिकने चाकूने वार केले. हा प्रकार बघून ऋतिकचा चुलत भाऊ रवी हा मध्यस्थी करण्यास आला असता त्याच्यावर देखील ऋतिकने चाकूने वार केले. हिल लाईन पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पोलिसांनी या प्रकरणी सलीम असगर अली उर्फ झिंझोला ( 19 ) याला अटक केली आहे. मात्र मुख्य आरोपी ऋतिक आणि त्याचे अन्य साथीदार अद्यापही फरार आहेत. अंबरनाथ पोलीस ठाण्यासमोरदेखील गंभीर गुन्हा काही दिवसांपूर्वी घडला होता. रात्री 11. 30 च्या सुमारास या पोलीस ठाण्याजवळील गुजराती शाळेजवळून अब्रार सलमानी हा तरुण पायी जात असताना 3 अज्ञात इसमांनी त्याच्यावर हल्ला करून त्याचा 11 हजार रुपये किंमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल व खिशातील दीड हजार रुपये रोख रक्कम आरोपींनी लुटली व फरार झाले . काल याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

चोरांचाही सुळसुळाट

या घटनांव्यतिरिक्त अन्य दोन लुटमारीचे गुन्हे देखील घडले. अंबरनाथ ( प ) येथील ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात शुक्रवारी दुपारी 1 .45 वाजताच्या कमलाबाई अर्जुन शेंडे ( 55) ही महिला कामावर दुपारचे जेवण करून कामावर जात असताना तीन अज्ञात इसम त्यांच्यामागून मोटारसायकलवर आले आणि त्यांनी कमलाबाई यांच्या हातातील कापडी पिशवी खेचली आणि आरोपी फरार झाले . पिशवीमध्ये 20 हजार रुपये होते , आरोपी त्यांच्या पाळतीवर असल्याचा संशय आहे . याप्रकरणी 3 अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे .

आम्ही या गुन्ह्याचा तपास करीत आहोत,एका आरोपीला अटक देखील केली आहे.अशा घटना घडणार नाहित याची दक्षता घेतली जाईल.शहरातील दक्ष नागरिकांनी माहिती दिल्यास वेळीच नियंत्रण ठेवता येईल.
– घनश्याम पलंगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,हिललाईन पोलीस ठाणे

First Published on: February 10, 2019 4:24 AM
Exit mobile version