भिवंडीत मलनि:स्सारण उदंचन केंद्राच्या खड्ड्यात पडून चिमुरडीचा मृत्यू

भिवंडीत मलनि:स्सारण उदंचन केंद्राच्या खड्ड्यात पडून चिमुरडीचा मृत्यू

भिवंडी शहरात मलनि:स्सारण प्रकल्प राबविला जात असून यामध्ये ठेकेदार ईगल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडून भुयारी गटर आणि ठिकठिकाणी उदंचन केंद्र बनविली जात आहेत. शहरातील चव्हाण कॉलनी कोंडाजी वाडी या भागात उदंचन केंद्र बनविण्यात येत असून तेथे सुमारे तीस फूट खड्डा खोदण्यात आला आहे. कोरोना काळात काम बंद असल्याने या खड्ड्यात पाणी साचून डबके झाले आहे. शुक्रवारी नजीकच्या झोपडपट्टीतील गौसिया आरिफ शेख (वय ३) आणि रेहान इम्रान शेख (वय ५) ही दोन चिमुकली मुले त्या ठिकाणी खेळत होती. त्यावेळी त्यांचा तोल जाऊन ती पाण्यात बुडाली.

नजीकच्या इमारतीवर काम करणार्‍या मजुरांच्या लक्षात ही घटना येताच त्यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी पाण्यात उड्या मारून या दोन्ही मुलांना बाहेर काढले आणि नजीकच्या आयजीएम रुग्णालयात दाखल केल. त्या ठिकाणी डॉक्टरांनी गौसिया आरिफ शेख या मुलीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. तर रेहान इम्रान शेख (वय ५) हा वाचला असून त्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटने नंतर स्थानिक नागरिक संतप्त झाले. त्यानंतर शांतीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत या पोलीस फौजफाटा घेऊन घटनास्थळी आणि आयजीएम रुग्णालय येथील परिस्थिती आटोक्यात आणली आहे.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून येथे काम करणार्‍या ईगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने सुरक्षा रक्षक ठेवणे गरजेचे होते. ते न ठेवल्याने ही दुर्घटना घडल्याने कंपनी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा स्थानिक नगरसेवक अरुण राऊत यांनी दिला.

First Published on: January 1, 2021 8:17 PM
Exit mobile version