वाझेंना हटवण्याचा बैठकीतील निर्णय मुख्यमंत्र्यांनी बदलला, फडणवीसांचा आरोप

वाझेंना हटवण्याचा बैठकीतील निर्णय मुख्यमंत्र्यांनी बदलला, फडणवीसांचा आरोप

वाझेंना हटवण्याचा बैठकीतील निर्णय मुख्यमंत्र्यांनी बदलला, फडणवीसांचा आरोप

ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंतर्गत असलेल्या गुप्त वार्ता पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना पदावरून दूर करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमान्य केल्याने विधानसभेत मंगळवारी विरोधक आक्रमक झाले. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या दालनात झालेल्या बैठकीत वाझे यांना गुन्हे शाखेतून बाजूला करण्याचा निर्णय झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. देशमुख यांनी या निर्णयाची माहिती उद्धव ठाकरे यांना दिली. ठाकरे यांनी हा निर्णय मान्य केला नाही.

बैठकीतील निर्णय सभागृहात बदलण्यात आल्याने विरोधी पक्ष अधिकच आक्रमक झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दबावापोटी गृहमंत्र्यांनी हा निर्णय बदलल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. विरोधी पक्ष आपल्या मागणीवर ठाम असल्याने आज, बुधवारी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.

हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा वाझेंशी सबंध आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी आज दिवसभर गदारोळ केला. त्यावर तोडगा काढण्यासाठी उपाध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या गटनेत्यांची बैठक झाली. या बैठकीत वाझे यांना निलंबित करून चौकशी करण्याची मागणी सत्ताधारी पक्षाने फेटाळून लावली. मात्र चर्चेनंतर वाझे यांना आहे त्या पदावरून बदली करण्यावर एकमत झाले. त्यामुळे सुरुवातीच्या गोंधळानंतर कोंडी फुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते. मात्र, सभागृहात अनिल देशमुख यांनी वाजे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यास नकार दिला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली.

वाझे यांना निलंबित नाही तर त्यांची आहे त्या जागेवरून बदली करण्याचे ठरले होते. मात्र, अनिल देशमुख हे उद्धव ठाकरे यांना भेटल्यानंतर त्यांनी हा निर्णय बदलला. मुख्यमंत्री वाझे यांना पाठीशी घालत आहेत, असा आरोप फडणवीस यांनी लगावला.


हेही वाचा – मनसुख हिरेन यांची सरकार पुरस्कृत हत्या, खासदार मनोज कोटक यांचे ट्विट

 

First Published on: March 9, 2021 10:33 PM
Exit mobile version