खासगी रुग्णालयांच्या खाटा ताब्यात घेण्यास विलंब, श्वेतपत्रिका काढण्याची भाजपची मागणी

खासगी रुग्णालयांच्या खाटा ताब्यात घेण्यास विलंब, श्वेतपत्रिका काढण्याची भाजपची मागणी

खासगी रुग्णालयांच्या खाटा ताब्यात घेण्यास विलंब

खासगी रुग्णालयांना कोण पाठिशी घालत आहे, असा सवाल करत खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा कुणाच्या दबावामुळे ताब्यात घेतल्या जात नाही, असा जाब महापालिका प्रशासनाला विचारला. त्यामुळे रुग्णालयात खाटा उपलब्ध होत नाही. वारंवार पाठपुरावा करूनही या जागा ताब्यात घेतल्या जात नसल्याने भाजपच्या मुंबईतील नगरसेवकांनी आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्तांच्या दालनाबाहेर तोंडावर काळी पट्टी लावून मुक आंदोलन केले. यावेळी खासगी रुग्णालयांतील खाटांसदर्भात श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी भाजपने केली आहे.

मुंबईतील खाजगी रुग्णालयातील ८० टक्के म्हणजेच १६ हजार बेड्स बाबत महापालिकेने श्र्वेतपत्रिका काढावी, तसेच हे बेड्स २४ तासात ताब्यात घ्यावेत. महापालिका व खाजगी रुग्णालयातील सर्व उपलब्ध बेड्सची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण कक्षातील डॅशबोर्डवर आणावी. तसेच हा डॅशबोर्ड मोबाइल अॅपवर सामान्य मुंबईकरांना उपलब्ध करून द्यावा. याशिवाय खाजगी रुग्णालयात कोविड रूग्णांच्या उपचाराचे दरपत्रक प्रसिद्ध करावे आदी मागण्यांसाठी तसेच कोरोनाग्रस्त रूग्णांप्रती महापालिकेची संवेदनहिनता समोर आणण्यासाठी सत्ताधारी आणि प्रशासनाला धारेवर धरण्यासाठी महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांनी धरणे आंदोलन केले.

मुंबई महापालिकेचे भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या नेृत्वाखाली पक्षनेता विनोद मिश्रा व नामनिर्देशित नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांच्या भाजपच्या नगरसेवकांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त इक्बाल सिंह चहल तसेच अतिरक्त आयुक्त यांच्या दालनाबाहेर तोंडावर काळी पट्टी तथा मास्क बांधुन एक तास मुक धरणे आंदोलन केले. या नंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना भाजपचे महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी २१ मे २०२० रोजी महाराष्ट्र शासनाकडून आदेश आले. याला १४ दिवस झाल्यानंतरही आजपर्यंत खाजगी रुग्णालयातील रूग्ण बेड, अतिदक्षता – व्हेंटिलेटर बेड्स मुंबईकरांस उपलब्ध झालेले नाहीत.

कोरोनामुळे त्रस्त मुंबईकर रूग्ण बेडसाठी वणवण भटकत आहेत. बेड, आयसीयु ,व्हेंटिलेटर मिळाला नाही म्हणून आजपर्यंत शेकडो गंभीर रूग्णांची प्राणज्योत मालवली आहे. भाजपने सातत्यपूर्ण पत्रव्यवहार, व्हॉट्सअप, इमेल, ट्विट तसेच प्रत्यक्ष भेटीत चर्चा केल्यानंतरही मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शासन आणि प्रशासनाने अद्याप खाजगी रुग्णालयातील वैद्यकीय बेड्स ताब्यात घेतलेले नाहीत. त्यामुळे या खाजगी रुग्णालयांना कोण पाठिशी घालते असा सवाल त्यांनी केला आहे.

यावेळी झालेल्या आंदोलनात नगरसेवक अतुल शाह, नगरसेविका उज्ज्वला मोडक, रिटा मकवाना, दक्षा पटेल,ज्योती अळवणी, राजश्री शिरवाडकर, नेहल शाह, नगरसेवक कमलेश यादव, अभिजित सामंत, सुनिल यादव, अॅड मकरंद नार्वेकर, सुषम सावंत, अनीश मकवानी आदी सहभागी झाले होते.


हेही वाचा – अजोय मेहता यांची हॅट्रिक
First Published on: June 5, 2020 9:42 PM
Exit mobile version