मुंबईला डेंग्यूचा डंख; ५ महिन्यांत १४ बळी

मुंबईला डेंग्यूचा डंख; ५ महिन्यांत १४ बळी

प्रातिनिधिक फोटो

पावसाळा आता संपला आहे पण वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलामुळे आजारांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. सध्या मुंबईसह राज्याला डेंग्यूने विळखा घातला असल्याचं समोर येत आहे. आतापर्यंत मुंबईत डेंग्यूचे एकूण १४ बळी गेले आहेत. तर, या महिन्यात ३ हजार ८७५ डेंग्यूसदृश्य रुग्ण आढळले आहेत. जून ते सप्टेंबर या दरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. या दरम्यान डेंग्यू, हिवताप (मलेरिया), लेप्टोस्पायरोसिस आणि गॅस्ट्रो आदी आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं ही स्पष्ट झालं आहे.

७ वर्षाच्या मुलाचाही डेंग्यूमुळे मृत्यू

महापालिकेच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या अहवालानुसार, २०१८ च्या ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूचे २४९ एवढे रुग्ण आढळले आहेत. तर, ३ हजार ८७५ एवढे डेंग्यूसदृश रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तर, गेल्यावर्षी याच महिन्यात ३ हजार २९३ एवढे डेंग्यूसदृश रुग्ण आढळले होते. तर या महिन्यात डेंग्यूमुळे २ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यानुसार, जून ते ऑक्टोबर दरम्यान आतापर्यंत एकूण १४ जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. यात एका ७ वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे.

हे वाचा – मुंबईकरांनो सावधान! डेंग्यू, मलेरिया पुन्हा पसरतोय

स्वाईन फ्लूचा ही वाढता धोका

मुंबईत जानेवारी ते ऑक्टोबर या १० महिन्यांच्या कालावधीत स्वाईन फ्लूचे एकूण १७ केसेसची नोंद करण्यात आली आहे. तसंच, राज्यात आतापर्यंत स्वाईन २६८ रुग्णांना स्वाईन फ्लूमुळे जीव गमवावा लागला आहे. तसंच, ३२ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. याशिवाय, ४४६ रुग्णांवर राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यामुळे हा धोका वाढू शकतो अशी भीती वर्तवण्यात आली आहे. राज्यात सध्या स्वाईन फ्लूची लागण झालेले सुमारे २३०० रुग्ण आहेत.

तर, ऑक्टोबर महिन्यात मलेरियाचे ४६१ रुग्ण, लेप्टोचे १६, डेंग्यूचे २४९, एच१एन१ १६, गॅस्ट्रोचे ५०७, हेपेटायसिस ७६ एवढे रुग्ण आढळले आहेत. तसंच, सप्टेंबर महिन्यात तब्बल ५ जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला होता. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, १४ ते ६० वयोगटातील १३० पुरुषांना डेंग्यू या आजाराचं निदान झालं आहे. तर, याच वयोगटातील ५४ महिला डेंग्यूमुळे त्रस्त आहेत. तसंच, २५ ते २९ या वयोगटात एकूण १०८ रुग्ण आढळले आहेत. ही संख्या सर्वाधिक आहे.

अरे बापरे, अभिनेत्री श्रद्धा कपूरला झाला डेंग्यू
First Published on: October 31, 2018 8:44 PM
Exit mobile version