मुंबईत डेंग्यूचे रुग्ण वाढले; सप्टेंबरमध्ये डेंग्यूचे ५ बळी

मुंबईत डेंग्यूचे रुग्ण वाढले; सप्टेंबरमध्ये डेंग्यूचे ५ बळी

डेंग्यू

महापालिकेच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या अहवालानुसार १६ सप्टेंबर २०१८ पर्यंत असलेली डेंग्यूच्या रुग्णांची संख्या २१३ वरून सप्टेंबरअखेर ३९८ वर पोहोचली आहे. तर या महिन्यात तब्बल ५ जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. तसच जून ते सप्टेंबर या महिन्यादरम्यान डेंग्यूमुळे ९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सप्टेंबर या फक्त एका महिन्यात जवळपास ४ हजार ३६५ डेंग्यू संशयित रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल झाले आहेत. गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात ३ हजार ७२१ रुग्ण आढळले होते.

वाळकेश्वर परिसरात महिलेचा मृत्यू

वाळकेश्वर इथे राहणाऱ्या ४२ वर्षीय महिलेला २० सप्टेंबर रोजी एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना ४ ते ५ दिवसांपासून थंडी ताप, अंगदुखी असा त्रास होत होता. शिवाय, त्या लंडनहून फिरून आल्या होत्या, असही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या प्लेटलेट्स मोठ्या प्रमाणात कमी झाल्या. त्यानंतर त्यांना डेंग्यू झाला असून त्यांचे अनेक अवयव निकामी झाल्याचं सांगत त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. या घटनेनंतर वाळकेश्वर भागात डेंग्यूचा रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेकडून ४२५ घरांचं सर्वेक्षण करण्यात आलं.

कांदिवलीतही डेंग्यूचे रूग्ण

कांदिवलीतील आकुर्ली रोड या परिसरातील एका १३ वर्षीय मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाला. त्यानंतर या भागातील २ हजार १२५ जणांचं सर्वेक्षण करण्यात आलं. तर ५८ वर्षीय महिलेला देखील ४ ते ५ दिवस सतत श्वास घ्यायला त्रास होत होता. शिवाय, तापाची ही लक्षणे होती. या महिलेचा १५ सप्टेंबरला डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. या परिसरातील ४७६ घरांचं सर्वेक्षण करण्यात आलं. त्यात १ हजार ९०१ जणांच्या तपासणी करण्यात आली.

आग्रीपाड्यातही पालिकेचे सर्वेक्षण

सांताक्रूझ येथील आग्रीपाडा परिसरातील ४२ वर्षीय व्यक्तीला सतत १० दिवस अशक्तपणा आणि ताप येत होता. लगेचच त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांनंतर त्यांना बरं वाटलं. पण, पुन्हा त्यांची तब्येत बिघडली आणि पालिका रुग्णालयात दाखल केलं. मात्र अचानक १० तारखेला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याकारणाने त्यांचा मृत्यू झाला. या परिसरातील ५०० घरांचं सर्वेक्षण करुन २ हजार ६७५ जणांचं स्क्रिनिंग करण्यात आलं.

लेप्टोचा एक बळी

मुंबईत आता लवकरच परतीचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पाऊस सुरू झाला की, संसर्गजन्य आजार पसरायला सुरूवात होते. यावर्षी पावसाच्या सुरुवातीपासूनच लेप्टोचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले. आता सप्टेंबर महिन्यात ही लेप्टोचा एक बळी गेल्याचं अहवालात नमुद करण्यात आलं आहे. तर मुंबईत आतापर्यंत लेप्टोमुळे १२ बळी गेले आहेत.

वाचा : अभिनेत्री श्रद्धा कपूरला झाला डेंग्यू

स्वाईन फ्लूचा एक रुग्ण

पुणे, नाशिकनंतर मुंबईत ही स्वाईन फ्लू हळूहळू डोकं वर काढत असल्याचं पाहायला मिळत आहे. महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, यंदा जानेवारीपासून ऑगस्टपर्यंत एकही स्वाईन फ्लूचा रुग्ण नव्हता. पण, आता सप्टेंबरमध्ये स्वाईन फ्लूचा पहिला रुग्ण आढळला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी खबरदारी बाळगण्याची गरज आहे.

आरोग्यमंत्रींना यावर्षीचा अहवाल दिला

राज्यातील स्वाईन फ्लूबाबत आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मंत्रालयात राज्याच्या साथरोग नियंत्रण समितीसोबत सप्टेंबर महिन्यात बैठक घेतली होती. त्यावेळी स्वाईन फ्लूमुळे राज्यात जानेवारीपासून २५ सप्टेंबरपर्यंत ८८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. त्यापैकी सर्वाधिक मृत रुग्ण नाशिक आणि पुण्यात होते.

First Published on: October 4, 2018 7:13 PM
Exit mobile version