‘डॉ. बाबासाहेबांचे कार्य, विचारांवरील श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही’

‘डॉ. बाबासाहेबांचे कार्य, विचारांवरील श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही’

‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ऐतिहासिक महत्वाच्या ‘राजगृह’ निवासस्थानी झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्हं असून हे समाजविघातक विकृत मानसिकतेचं दुष्कृत्य आहे. राज्य शासनाकडून या घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून तपासकार्य सुरु केलं आहे. आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी, असे दुष्कृत्य करणाऱ्या समाजविघातक शक्तींच्या कुहेतूला बळी पडू नये. शांतता, संयम पाळावा, एकजूट कायम ठेवावी’, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. या घटनेचा राजकीय नेत्यांकडून निषेध व्यक्त होत आहे.

‘राजगृह’ तोडफोडीची घटना निषेधार्ह

‘महामानव डॉ. बाबासाहेबांचे कार्य आणि विचार समाजमनात खोलवर रुजले आहेत. आपल्या सर्वांची त्यांच्यावर भक्कम श्रद्धा आहे. त्या श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही’, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृहा’वर मंगळवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड देखील केली गेली. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहे. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. या घटनेचा निषेध राजकीय नेत्यांकडून व्यक्त होत आहे.

राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध

‘राजगृह हे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान आहे. आमच्यासारख्या आंबेडकर अनुयायांसाठी हे प्रेरणास्थळ आहे. राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो. हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर शासन करावे’, असे म्हणत अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी निषेश केला आहे.


हेही वाचा – ‘राजगृहा’वर हल्ला; दोषींवर कठोर कारवाईची गृहमंत्र्यांची ग्वाही


First Published on: July 8, 2020 9:39 AM
Exit mobile version