गणेश दर्शनाद्वारे फडणवीसांचा विरोधकांच्या चितपटीचा डाव

गणेश दर्शनाद्वारे फडणवीसांचा विरोधकांच्या चितपटीचा डाव

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने राजकीय जमवाजमवीकडे कूच केले आहे. आजवर ते शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांच्या गणपतीच्या दर्शनाला जायचे. काल त्यांनी विरोधी पक्षांतील अनेकांच्या गणपतींचे दर्शन घेतले. अर्थात गणपती दर्शनाचं निमित्त होतं. या दर्शनांच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी भेट घेतलेल्यांची चाचपणी केली, असे राजकीय विश्लेषकांना वाटत आहे.

महाराष्ट्रातील राजकारण २०१४ प्रमाणे सोपं नाही, याची चाहूल लागल्यापासून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांमध्ये पध्दतशीरपणे फूट पाडायला सुरुवात केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या महामंडळ भरतीत विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांची वर्णी लावून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चेकमेट करण्याचा प्रयत्न केला. सेनेचे हाजी अराफत, राष्ट्रवादीचे संभाजी पाटील यांची महामंडळांवर वर्णी लावत त्यांना भाजपवासी करून घेतले. काल गणपतीनिमित्त त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांच्या बांद्रा येथील घरी दर्शनाला जाऊन सगळ्यांनाच धक्का दिला. राजकारणात मित्रांहून विरोधकांना जपावं लागतं, हे मुख्यमंत्र्यांनी उत्तमपणे साधलं. शिवसेना सचिव आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या घरगुती गणपतीच्या दर्शनाला जाणं ही आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी जणू प्रथाच बनलीय.

गेल्या चार वर्षांपासून फडणवीस नार्वेकर यांच्या घरगुती गणपतीच्या दर्शनाला जात आहेत. नार्वेकर पूर्वी मालाड येथील लिबर्टी गार्डन परिसरात राहायचे. गेल्या वर्षी ते वांद्रे पूर्व, पाली हिल येथील कुकरेजा हाईट्स या इमारतीत राहण्यास आले आहेत. शिवसेनेतील निर्णयात नार्वेकर यांचा सहभाग असतो, याची जाणीव एव्हाना मुख्यमंत्र्यांना आहेच. याचाच भाग म्हणून मुख्यमंत्र्यांकडून नार्वेकर यांची वेळोवेळी वास्तपुस्त केली जात असल्याचं सांगितलं जातं.

या इमारतीत सातव्या मजल्यावर नार्वेकर राहतात, तर आठव्या मजल्यावर काँग्रेसचे नेते आणि आघाडी सरकारमधले माजी मंत्री कृपाशंकर सिंह राहतात. कृपाशंकर यांच्याकडे पुन्हा एकदा मुंबई काँग्रेसची जबाबदारी येण्याची चर्चा आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री कृपाशंकर यांना आपल्याकडे घेण्यासाठी चुचकारत असावेत, असं बोललं जातं. याआधी मुख्यमंत्री कृपांच्या घरी गेले नव्हते. अचानक झालेल्या या भेटीने राजकीय विश्लेषकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

जयदत्त क्षीरसागऱ यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपाशी जवळीक ठेवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे बंधू भारतभूषण क्षीरसागर यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थान ‘वर्षा’वर जाऊन मुख्यमंत्र्यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेतलं. जयदत्त क्षीरसागर आणि देवेंद्र फडणवीस यांची ही भेट नवीन नाही. यापूर्वी ज्यावेळी फडणवीस बीडमध्ये आले होते, तेव्हा ते थेट क्षीरसागर यांच्या घरी चहा- पाण्यासाठी गेले होते. तेव्हापासून क्षीरसागर यांची भाजपसोबतची जवळीक दिवसेंदिवस वाढत आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर, क्षीरसागर हे पंकजा मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजे ‘रॉयल स्टोन’वर गेले. तिथे त्यांनी पंकजांच्या विघ्नहर्त्याचं दर्शन घेतलं. विशेष म्हणजे या दोन्ही ठिकाणी भाजपाकडून विधानपरिषदेचे आमदार झालेले सुरेश धस त्यांच्यासोबत होते.

युतीतल्या सरकारमध्ये असून अलीकडे रोज निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा करण्यार्‍या शिवसेनेला जपणं, हा भाग जसा नार्वेकर यांच्याद्वारे सेनेला कुरवाळण्याचा भाग मानला जातो तसाच कृपांकरवी काँग्रेसला जपण्याचा प्रयत्नही दिसत आहे. तिसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर यांच्या ‘वर्षा’ भेटीनेही अनेकांना आश्चर्यचकीत केलं आहे.

First Published on: September 15, 2018 2:49 AM
Exit mobile version