‘स्वाभिमान जपण्याचा मूलमंत्र आदरणीय बाळासाहेबांनी दिला’

‘स्वाभिमान जपण्याचा मूलमंत्र आदरणीय बाळासाहेबांनी दिला’

देवेंद्र फडणवीस

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज सातवा स्मृतिदिन आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून बाळासाहेबांना अभिवादन केले आहे. या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करताना फडणवीसांनी ट्विटसोबत एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. हा व्हिडिओ ट्विट करत बाळासाहेबांनी सांगितलेल्या गोष्टीची आठवण शिवसेनेला करून दिली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने  भाजपापासून लांब जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथमच फडणवीस यांनी शिवसेनेला बाळासाहेबांनी सांगितलेल्या हिंदुत्वाची आठवण करून देण्याचा प्रयत्न याट्विटद्वारे केल्याचे दिसतेय.

बाळासाहेब हे उर्जेचे स्त्रोत होते

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ७ व्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करत फडणवीसांनी आदरांजली दिली आहे. बाळासाहेबांचे व्यक्तिमत्त्व हे अत्यंत स्फूर्ती देणारं तसेच महाराष्ट्राचे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय अशा सर्व प्रकारचं वैभव म्हणजे बाळासाहेब ठाकरे होते. यावेळी ‘बाळासाहेब हे उर्जेचे स्त्रोत होते. आपल्या विचार आणि वकृत्वाने लोकांना आपले करण्याची त्यांची ताकद होती. स्वाभिमान जपण्याचा मूलमंत्र आदरणीय बाळासाहेबांनी आपल्या सर्वांना दिला’, असे देखील ते या व्हिडिओद्वारे म्हणाले आहेत.

शिवतीर्थावरील स्मृतिस्थळाच्या भेटीस शिवसैनिक 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज, रविवारी मुंबईतील शिवाजी पार्क येथे त्यांच्या स्मृतिस्थळाला भेट देण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक येणार आहेत. त्यामुळे शनिवारपासूनच शिवसेनेतर्फे शिवाजी पार्क येथे तयारी सुरू करण्यात आली आहे. शनिवारी रात्री पासूनच मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमा होऊ लागले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य शिवसैनिक बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर जमा होणार आहेत.

First Published on: November 17, 2019 9:36 AM
Exit mobile version