CAA, NRC वरून गदारोळ; वस्‍तुस्‍थिती मांडून संभ्रम दूर करा – देवेंद्र फडणवीस

CAA, NRC वरून गदारोळ; वस्‍तुस्‍थिती मांडून संभ्रम दूर करा – देवेंद्र फडणवीस

सीएए, एनआरसी आणि एनपीआर या मुददयावर विधानसभेत अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी जोरदार धुमशान झाले. भाजपा विरूद्ध महाविकास आघाडी असा जंगी सामना दिसून आला. सत्‍ताधारी बाकांवरील मंत्रीच आक्रमक झाल्‍याचे चित्र सभागृहात होते. सत्‍ताधारी आणि भाजपा यांच्यात जोरदार शाब्‍दिक चकमक उडाली. विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांना कामकाज अर्ध्या तासाकरता तहकूबही करावे लागले. अखेर वादग्रस्‍त वक्‍तव्ये कामकाजातून काढून टाकल्‍यानंतर कामकाज सुरळीत सुरू झाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरत ‘केवळ मतांचे राजकारण करू नका, वादग्रस्‍त वक्‍तव्ये करणाऱ्या उमर खालिदवर कारवाई करा, तसेच सीएए, एनपीआर या मुददयांवर वस्‍तुस्‍थिती जनतेसमोर मांडा व संभ्रम दूर करा’, अशी मागणी केली.

गोंधळानंतर कामकाज झालं तहकूब

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहविभागाच्या अर्थसंकल्‍पीय अनुदान मागण्यांवरील चर्चेत भाग घेताना राज्‍यातील कायदा व सुव्यवस्‍था बिघडत चालल्‍यावर बोट ठेवले. यावेळी चर्चा सुरू असताना भाजपा आणि सत्‍ताधारी आघाडीतील मंत्री यांच्यात जोरदार शाब्‍दिक चकमक उडाली. देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांच्या मुद्द्यांना छगन भुजबळ, नवाब मलिक, अनिल परब, सुनिल केदार, धनंजय मुंडे आदींकडून जोरदार प्रत्‍युत्‍तर मिळाले. विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी हस्‍तक्षेप करत कामकाज अर्धा तास तहकूब केले. वादग्रस्‍त भाग कामकाजातून काढून टाकण्यात आल्‍यानंतर कामकाज पुन्हा सुरळित झाले.

‘संभ्रम निर्माण केला जातोय’

‘सीएएमुळे कोणत्‍याही भारतीय नागरिकाचे नागरिकत्‍व जाणार नाही. हा नागरिकत्‍व घेणारा कायदा नाही तर नागरिकत्‍व देणारा कायदा आहे. देशात जी आंदोलने सुरू आहेत ती केवळ गृहितकांवर सुरू आहेत. कोणाकडूनही कागदपत्रे मागण्यात येणार नाहीत. दिलेल्‍या माहितीचे कोणतेही व्हेरिफिकेशन करण्यात येणार नाही. असे असताना केवळ मतांच्या राजकारणासाठी संभ्रम निर्माण करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्‍लीला गेले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले. तेव्हा पाठिंबा जाहीर केला. मात्र, मुंबईत आल्‍यानंतर त्‍यांची भूमिका बदलली. त्‍यांनी समिती स्‍थापन केली. आता या समितीने एका दिवसात निर्णय जाहीर करण्याची गरज आहे. अल्‍पसंख्याक काय, कोणत्‍याच समाजाने या कायदयामुळे घाबरून जाण्याची गरज नाही, हे जाहीर झाले पाहिजे. या समितीने वस्‍तुस्‍थिती जाहीर केली पाहिजे’, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.


हेही वाचा – आमच्या योजना कॉपी-पेस्ट केल्या-देवेंद्र फडणवीस

‘उमर खालिदवर कारवाई करा’

‘उमर खालिदने महाराष्‍ट्रात सभा घेतल्‍या. त्‍याच्या सभेच्या ठिकाणी जे बॅनर लागले होते त्‍यावर राज्‍य सरकारमधील दोन मंत्र्यांचे फोटो होते. अमेरिकन राष्‍ट्राध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प जेव्हा भारतात येतील तेव्हा रस्‍त्‍यावर उतरा आणि आपली ताकद दाखवून दया असे हा खालिद म्‍हणाला होता. आता या उमर खालिदवर कारवाई करावी’, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. ‘मुंबईत सात सॅटेलाईट फोनचा वापर सुरू आहे अशी केंद्र सरकारच्या गुप्तवार्ता विभागाने राज्‍य सरकारला माहिती दिली आहे. यावर देखील कारवाई करा’, असेही ते म्‍हणाले.

First Published on: March 14, 2020 8:27 PM
Exit mobile version