‘ठाकरे सरकार हे जनतेच्या विश्वासघातातून निर्माण झालंय’

‘ठाकरे सरकार हे जनतेच्या विश्वासघातातून निर्माण झालंय’

आज २८ नोव्हेंबर रोजी ठाकरे सरकार अर्थात महाविकास आघाडीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्ताने शनिवारी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. राज्य सरकारचा वर्षभरातील लेखा-जोखा सादर करून एका वर्षांच्या कारभाराची पोलखोल केली. यावेळी ते असे म्हणाले की, ”एका वर्षात ठाकरे सरकारने कोणतीही अचिव्हमेंट केली नाही. आलेलं सरकार हे जनतेचा विश्वास घात करून आलं. मुख्यमंत्री पदाच्या घेतलेल्या शपथेचं कोणतंही पालन ठाकरे सरकारकडून होताना दिसत नाही. वेगवेगळ्या विकास कामांना स्थगिती देणं, याव्यतिरिक्त या सरकारकडे काहीच नाही,” असा टोलाही फडणवीसांनी यावेळी लगावला.

दरम्यान ठाकरे सरकारची वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्ताने भाजपाची सरकारला घेरण्याची तयारी सुरू झाल्याचे दिसतंय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या भूमिकेवर निशाणा साधला. त्याचबरोबर मुख्यमंत्री ठाकरे यांनी सामनाला दिलेली मुलाखत प्रतिक्रिया देण्याच्या लायकीचीही नाही,” असं टीकास्त्र फडणवीसांनी सोडलं आहे. यावेळी देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ‘ठाकरे सरकारची काळी पत्रिका’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाच्या माध्यमातून सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला जातोय.

कंगना प्रकरणात राज्य सरकारला चपराक

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत महाविकासआघाडीवर ताशेरे ओढले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या सरकारवर फडणवीसांनी सडकून टीका केली. यावेळी अर्णव गोस्वामी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारची कानउघडणी केली, कायद्याचा गैरवापर, किंवा सूडबुद्धीने करता येणार नाही असं स्पष्ट सांगितलं आहे. कंगना प्रकरणातही महापालिका आणि राज्य सरकारला चपराक लगावली आहे. अर्णव आणि कंगनाबाबत दोन्ही निर्णय म्हणजे कायद्याचा गैरवापराची उदाहरणे आहेत हे कोर्टाने दाखवलं आहे. हे दोन्ही निकाल आल्यानंतर कारवाई कुणावर होणार? गृहमंत्र्यांवर होणार की मुख्यमंत्री माफी मागणार? अधिकाऱ्यांनी गैरवापर केला तर त्यांच्यावर कारवाई होणार का? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीला हे शोभणारी नाही

महाराष्ट्राच्या इतिहास इतकं धमकावणारे मुख्यमंत्री यापूर्वी पाहिले नव्हते, मुख्यमंत्री संयमी आहेत हे ऐकलं होतं, गेल्या ५ वर्षात पाहिलं, पण दसऱ्याचं भाषण आणि कालची मुलाखत, मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीला शोभणारी नाही, असेही फडणवीस म्हणाले. तर सामनातील वर्षपूर्ती निमित्त दिलेल्या मुलाखतीबद्दल देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला. “एका वर्षात काय केले, पुढची दिशा काय, यावर मुख्यमंत्र्यांना सामनाच्या मुलाखतीत काहीच सांगता आले नाही. इतके धमकावणारे मुख्यमंत्री मी कधी पाहिले नव्हते, ते संविधानाची शपथ सुद्धा विसरले. नाक्यावरील भांडणात करायची वक्तव्य वर्षपूर्तीला करायची? मुख्यमंत्र्याची मुलाखत मला वाटली नाही. खरं तर मुख्यमंत्र्यांची सामनामध्ये आलेली मुलाखत ही प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची नाही,”

कोरोनाकाळात ठाकरे सरकार सपशेल अपयशी

“पाच वर्ष सरकार चालवणार असे हे म्हणतात. तुम्ही चालवा पण १ वर्षात काय दिसलं? हे सरकार जनतेचा विश्वासघात करुन आलेलं आहे. या सरकारने केवळ स्थगिती देण्याचं काम केलं, कोरोनाकाळात हे सरकार सपशेल अपयशी ठरलं. कोरोनाच्या काळात प्रचंड भ्रष्टाचार झाला, तो आम्ही उघडा पाडणार आहे. कोरोनाच्या काळात लूट करण्यात आली त्याची पोलखोल करु,” असेही फडणवीसांनी सांगितले.”

First Published on: November 28, 2020 11:39 AM
Exit mobile version