दहावी-बारावीच्या पेपरमध्ये पुरेसे अंतर ठेवा; पालक संघटनांची मागणी

दहावी-बारावीच्या पेपरमध्ये पुरेसे अंतर ठेवा; पालक संघटनांची मागणी

प्रातिनिधिक फोटो

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या इयत्ता १० आणि १२ वीच्या परीक्षांबाबत आज गुरूवारी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची १० वी आणि १२ वी च्या परीक्षांबाबत पालक संघटनांचे प्रतिनिधी व शिक्षकांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत कोरोनाचा फैलाव वाढता असल्याने यादरम्यान होणाऱ्या १० व १२ वी च्या परीक्षांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी दहावी-बारावीच्या परीक्षांच्या पेपरमध्ये पुरेसे अंतर ठेवण्याची मागणी पालक संघटनांच्या प्रतिनिधींनी केली.

अशी केली पालक संघटनांनी मागणी

इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षांमधील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या पेपरमध्ये पुरेसे अंतर ठेवावे, अशी मागणी पालक संघटनांच्या प्रतिनिधींनी शिक्षणमंत्री वर्षा गाय़कवाड यांच्याकडे केली. यासह कंटेण्टमेंट झोन, लॉकडाउन अथवा कोरोना लागण इत्यादी कारणांमुळे ज्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेणे शक्य होणार नाही त्यांच्याबाबत शासनाने विचार करावा. तसेच यासाठी वेगळे शुल्क आकारले जाऊ नये, अशी मागणीदेखील पालक संघटनांनी केली.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा वेळापत्रकानुसार देणे शक्य न झाल्यास त्या लेखीपरीक्षेनंतर घेण्यात येतील आणि त्यासाठी वेगळे शुल्क न घेण्याच्या सूचना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्यात. यावेळी या बैठकीस पालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत शिक्षण विभागातील अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे वंदना कृष्णा, पुण्यातील महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील, म. रा. शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर टेमकर, शैक्षणिक संशोधन वप्रशिक्षण परिषदेचे उपसंचालक विकास गरड हे अधिकारी उपस्थित होते.


First Published on: March 11, 2021 5:30 PM
Exit mobile version