केईएम रुग्णालयातील डॉक्टरची आत्महत्या

केईएम रुग्णालयातील डॉक्टरची आत्महत्या

डॉ. प्रणय जयस्वाल

केईएम रुग्णालयातील सीनिअर रेसिडन्स जनरल सर्जरी प्रणय राजकुमार जयस्वाल (27) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली. विषारी औषध घेऊन त्यांनी जीवन संपविले असून या आत्महत्येमागे कौटुंबिक कारण असल्याचे बोलले जाते. डॉ. प्रणय यांच्या आत्महत्येने केईएम रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी वर्गात प्रचंड शोककळा पसरली आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला असून या आत्महत्येची माहिती त्यांच्या अमरावती येथील पालकांना कळविण्यात आली आहे.

याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे. डॉ. प्रणय जयस्वाल हे मूळचे अमरावतीचे रहिवाशी असून तिथेच त्यांचे आई-वडील राहतात. गेल्या तीन वर्षांपासून ते केईएम रुग्णालयात एम.एसचे शिक्षण घेत होते. शिक्षण घेत असताना ते तिथे प्रॅक्टिस करीत होते. अलीकडेच त्यांनी चांगल्या गुणांनी शिक्षण पूर्ण केले होते. सध्या ते तिथे सीनिअर रेसिडन्स जनरल सर्जरी म्हणून कार्यरत होते. रुग्णालयातील हॉस्टेलमध्ये ते डॉ. समर्थ पटेल यांच्यासोबत राहत होते. तीन वर्षांत त्यांच्यासोबत राहत असताना त्यांनी त्यांच्या कौटुुंबिक समस्येबाबत अनेकदा चर्चा केली होती. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून ते कौटुुंबिक कारणावरून प्रचंड मानसिक तणावात होते.

शनिवारी सकाळी रुग्णालयातील आरएमओ हॉस्टेलच्या टेरेसवर प्रणय जयस्वाल यांचा मृतदेह सापडला. प्राथमिक तपासात प्रणय यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. ही माहिती मिळताच भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. प्रणय यांच्याकडे पोलिसांना सुसाईड नोट सापडली नाही, मात्र डॉ. समर्थ पटेल यांच्या जबानीवरून ते कौटुंबिक कारणावरून मानसिक तणावात होते.

त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी जीवन संपविल्याचा संशय व्यक्त केला आहे. ही माहिती त्यांच्या पालकांना कळविण्यात आली असून उद्यापर्यंत ते मुंबईत येण्याची शक्यता आहे. त्यांच्या पालकांची लवकरच पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे. याप्रकरणी पोलिसांनी एडीआरची नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे.

First Published on: November 17, 2019 6:19 AM
Exit mobile version