धमाल Video : जेव्हा ‘कुत्रा’ रॅम्पवॉक करतो

धमाल Video : जेव्हा ‘कुत्रा’ रॅम्पवॉक करतो

मुंबईमध्ये प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बालन यांचा जबरदस्त फॅशन शो नुकताच पार पडला. मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या फॅशन शोला फॅशन वर्ल्डमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. शोदरम्यान मॉडेल्सने डौलदार रॅम्पवॉक करत रोहित बालन यांचं शानदार लेटेस्ट कलेक्शन सादर केले. मात्र, या सगळ्यापलीकडे हा फॅशन शो खऱ्या अर्थाने चर्चेत आला तो एका कुत्र्यामुळे. शोदरम्यान रॅम्पवर एका भटक्या कुत्र्याने अचानक एन्ट्री घेतली. इतकंच नाही तर तो कुत्रा काही वेळासाठी रॅम्पवर घुटमळत राहिला. गंमतीचा भाग म्हणजे मॉडेल्सचं रॅम्पवॉक सुरु असताना हा कुत्रा अगदी लिलया त्यांच्यामध्ये वावरत होता. अचानक रॅम्पवर घुसलेल्या या कुत्र्याने सगळ्यांचेच लक्ष स्वत:कडे वेधून घेतले. या गमतीशीर प्रसंगाचा एका व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शोमध्ये कुत्र्याच्या अचानक येण्याने उडालेली धमाल आणि मॉडेल्सच्या चेहऱ्यावर आलेले टेन्शन स्पष्ट दिसून येत आहे.

उपलब्ध माहितीनुसार, काही काळ रॅम्पवर फिरल्यानंतरही कुत्रा स्टेजवरुन खाली उतरायचं नाव घेत नव्हता. कुत्र्याच्या मध्येमध्ये वावरण्याने मॉडेल्सना रॅम्पवॉक करण्यात अडचण येत होती. मॉडेल्सची होणारी पंचाईत लक्षात घेत अखेर एक क्रू मेम्बर स्टेजवर गेला आणि त्याने त्या कुत्र्याला पिटाळून लावले. या ग्रँड फॅशन शोमध्ये बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री डायना पेंटी यांनीही सहभाग घेतला होता.

यापूर्वी एका मांजरीने अशाच प्रकारे फॅशन शोमध्ये अचानक एंट्री घेतल्याचं वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्या मांजरीने फॅशन शोमध्ये नुसती एंट्री घेतली नव्हती, तर रॅम्पवर चक्क ‘कॅट वॉक’ देखील केले होते. त्या खऱ्याखुऱ्या ‘कॅट’वॉकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.


पाहा Video : खऱ्याखुऱ्या मांजरीचा रॅम्पवर ‘कॅट’वॉक

First Published on: January 18, 2019 1:12 PM
Exit mobile version