डोंबिवलीत बेकायदा बांधकामांचा धुमाकूळ!

डोंबिवलीत बेकायदा बांधकामांचा धुमाकूळ!

डोंबिवलीत बेकायदा बांधकामांचा धुमाकूळ

केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांनी बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याचा सपाटा लावला असतानाच आता ही कारवाई थंडावली आहे. २७ गावांमधील रजिस्ट्रेशन बंद करण्यात आल्याने, डोंबिवली पश्चिमेत मोठया प्रमाणात बेकायदा बांधकामांचा धुमाकूळ सुरू आहे. मात्र या बांधकामांना राजकीय आश्रय असल्याने पालिका प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

तक्रार करुनही कारवाई नाही

डोंबिवली पश्चिमेतील ‘ह’ प्रभाग क्षेत्राच्या हाकेच्या अंतरावर असलेली गायकवाडवाडी, नवापाडा, भोईरवाडी, गरीबाचावाडा, देवीचापाडा, कुंभारखानापाडा खाडी किनारी परिसरात सर्रासपणे बेकायदा बांधकामे सरू आहेत. चाळी तोडून अवघ्या सहा महिन्यात सात मजल्याच्या इमारती उभ्या केल्या जात आहेत. तसेच रस्ते अडवून इमारती उभ्या केल्या जात आहेत. पालिकेकडे तक्रार करूनही कोणतीच कारवाई केली जात नसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. पालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाच्या उपायुक्तपदाचा भार सुनील जोशी यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यानंतर उपायुकत जोशी यांनी कल्याण, टिटवाळा आणि २७ गाव परिसरात अनधिकृत बांधकामावर कारवाईची जोरदार मोहीम राबवली. पण, डोंबिवली पश्चिमेत बेकायदा बांधकामांचा धुमाकूळ सुरू असताना, अशा प्रकारची मोहीम राबविण्यात आली नसल्याने आश्यचर्य व्यक्त होत आहे.

अनधिकृत बांधकामात नगरसेवकाचा समावेश

डोंबिवली पश्चिमेतील अनधिकृत बांधकामात अनेक नगरसेवकांची पार्टनरशिप असल्याने या बांधकामांवर कारवाई केली जात नसल्याचे पालिकेतील एका कर्मचाऱ्याने सांगितले. अनधिकृत बांधकामात नगरसेवकाचा समावेश आढळून आल्यास, त्याचे नगरसेवकाचे पद रद्द होते. त्यामुळे अनधिकृत बांधकामात पडद्याआड छुप्या पध्दतीने पैसे लावले जात आहेत. त्यामुळे नगरसेवक समेार दिसून येत नाहीत. प्रत्येक अनधिकृत इमारत बांधण्याअगोदर स्थानिक नगरसेवक आणि प्रभाग क्षेत्र अधिकारी यांचे लक्ष्मीपूजन केल्यानंतर धुमधडाक्यात काम सुरू होते.

पालिकेतील भ्रष्टाचारात वाढ

बेकायदा बांधकामात लाच घेताना पालिकेतील अतिरिक्त आयुक्तांपासून अनेक प्रभाग क्षेत्र अधिकारी अडकले आहेत. पण पालिकेतील भ्रष्टाचार कमी होत नाही. २७ गावातील रजिस्ट्रेशन बंद करण्यात आल्याने डोंबिवली पश्चिमेत बेकायदा बांधकामांचा धुमाकूळ सुरू आहे. पालिका आयुक्त बोडके यांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येईल अशी स्पष्ट भूमिका घेतली असताना, ‘ह’ प्रभाग क्षेत्राकडून त्यांच्या भूमिकेला हरताळ फासत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे डोंबिवली पश्चिमेतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी पालिका आयुक्त पुढाकार घेतील का? असाच प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.

First Published on: February 15, 2019 9:02 PM
Exit mobile version