जे.जे. हॉस्पिटलमध्ये ‘देणगी समिती खाते’ सुरू

जे.जे. हॉस्पिटलमध्ये ‘देणगी समिती खाते’ सुरू

जे.जे हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले

मुंबईतील जे.जे या सरकारी हॉस्पिटलमध्ये देणगी समिती खात्याची सुरुवात करण्यात आली आहे. या खात्याअंतर्गत हॉस्पिटल आणि रुग्णांसाठी आवश्यक ती उपकरणं दान करता येऊ शकणार आहेत. त्यासोबतच देणगी स्वरुपात निधी देखील गोळा दान करता येणार आहे. या निधीचा फायदा गरीब रुग्णांसाठी करण्यात येणार आहे. देणगी समिती खात्याच्या माध्यमातून दानशूर व्यक्ती आणि संस्थांना सहायता निधी, वैद्यकीय उपकरणे दान करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. जेणेकरून, महत्त्वाच्या शस्त्रक्रिया आणि प्रत्यारोपण अशा काही मोठ्या वैद्यकीय उपचारांकरिता दुर्बल घटकांतील रुग्णांना मदत करण्यात येईल, अशी भावना जे.जे हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी व्यक्त केल्या आहेत.
१५ डिसेंबर रोजी या खात्याअंतर्गत  सावला ट्रस्टने सव्वा कोटींची औषधं जे.जे. हॉस्पिटलला दिली आहेत. त्यामुळे सध्या हॉस्पिटलमध्ये लागणारी औषधं आता मुबलक प्रमाणात आहेत.

औषधंही करु शकता दान…

याविषयी अधिक माहिती देताना जे.जे हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितलं की, “आता कायदेपद्धतीने आणि अगदी सुरळीतपणे हे खातं सुरू झालं आहे. त्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. या खात्यासाठी एका पॅनकार्डची गरज होती. त्यानुसार आता देणगी समिती पॅनकार्ड ही उपलब्ध झालं आहे. त्यामुळे, या खात्याअंतर्गत लोकं दान करु शकतील. ज्यात दान म्हणून देणगी, साहित्य आणि उपकरणे यांचा समावेश आहे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या खात्याचं काम पाहिलं जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त दानशूर लोकांनी हॉस्पिटलला दान करावं.”
”आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी उत्तम डॉक्टर घडवणे ही सर्वात मोठी जबाबदारी आहे. त्यासठाठी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून उत्तम डॉक्टर घडवण्यावर अधिक भर देण्यात येणार आहे”, अशी महिती डॉ. चंदनवाले यांनी सांगितले.
First Published on: December 31, 2018 6:00 AM
Exit mobile version