पायल तडवी आत्महत्या प्रकरण: आयएमएची सत्य शोधक समिती स्थापन

पायल तडवी आत्महत्या प्रकरण: आयएमएची सत्य शोधक समिती स्थापन

डॉ. पायल तडवी

निवासी डॉक्टर डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येचा कसून तपास व्हावा यासाठी आयएमए म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशनकडून सत्य शोधक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती डॉ.पायला तडवी यांच्या आत्महत्येची पार्श्वभूमी आणि महत्त्वाच्या घटकांचं मूल्यमापन करणार आहे.

निवासी डॉक्टरांवर आणि प्रामुख्याने सरकारी हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांवर कामाचा ताण असतो आणि त्यातून त्यांना नैराश्य येते. पण, डॉ. पायलच्या प्रकरणात, जातीय भेदभाव आणि कलंक हे आरोप करण्यात आले आहेत. जर हे खरे असेल तर हा फार गंभीर विषय आहे आणि त्यावर उपाय करणं गरजेचं आहे.

डॉक्टरांना ज्या हालाखीच्या स्थितीत काम करावे लागते ती स्थिती आणि विशेषतः सरकारी हॉस्पिटलमधील राहण्याची व्यवस्था, त्यांच्यावर नेहमीच लादला जाणारा कामाचा असाधारण ताण आणि क्लिनिकल कौशल्यांच्या अभावाबद्दल नेहमी केला जाणारा उपहास, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही, असं यावेळेस या समितीतील डॉक्टरांनी सांगितलं. आयएमएची सत्यशोधक समिती एका आठवड्यात राष्ट्रीय अध्यक्षांकडे अहवाल सादर करणार आहे.

या सत्यशोधक समितीमध्ये अशोक आढाव आणि डॉ. रवी वानखेडकर (आयएमएचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष), डॉ. चंद्रकांत म्हस्के (डीन जीएमसी-नांदेड). डॉ. होजी कपाडिया (आयएमए महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, मुंबई), डॉ सुहास पिंगळे (आयएमए महाराष्ट्र राज्य सचिव) यांचा समावेश आहे. सध्याच्या परिस्थितीत  ‘उपचारात्मक उपाययोजना’(रेमेडियल मेझर्स)  विचारात घेण्यात येणार आहे.

First Published on: May 31, 2019 10:55 PM
Exit mobile version