रेखाकला परीक्षा 14 नोव्हेंबरपासून

रेखाकला परीक्षा 14 नोव्हेंबरपासून

शालेय स्तरावर होणार्‍या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा 14 ते 17 नोव्हेंबरदरम्यान घेण्याचा निर्णय कला संचालनालयाने जाहीर केला आहे. निवडणुकीच्या कामामध्ये राज्यातील तब्बल दीड हजार कला शिक्षक गुंतल्याने कला संचालनालयाने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.

एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळा सुरू झाल्यावर लगेचच घेण्याचा निर्णय संचालनालयाने घेतला आहे. त्यामुळे ही परीक्षा 14 ते 17 नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. परीक्षेसंबंधीत सूचना व वेळापत्रक www.doa.org.in या कला संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती संचालनालयाचे परीक्षा नियंत्रक नागेश वाघमोडे यांनी परिपत्रकाद्वारे दिली. राज्यभरातील सुमारे ११०० परीक्षा केंद्रांवर 26 सप्टेंबरपासून एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा होणार होती. मात्र त्याचवेळी निवडणूक आयोगाने राज्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे बहुसंख्य कलाशिक्षकांना निवडणुकीची कामे लावण्यात आली.

शिक्षक निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने परीक्षा घेण्यात येणारी अडचण लक्षात घेऊन कला संचालनालयाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी परीक्षेसंदर्भातील वेळापत्रक लवकरच संचालनालयाच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले होते. निवडणुकीनंतर लगेचच शाळांना दिवाळीची सुट्टी असल्याने या परीक्षेला कधीचा मुहूर्त मिळेल याकडे शिक्षक व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते.

First Published on: October 13, 2019 1:09 AM
Exit mobile version