मुंबईमध्ये उडता पंजाब! ‘न्याहरी’ कोडवर्डच्या आड गांज्याची विक्री

मुंबईमध्ये उडता पंजाब! ‘न्याहरी’ कोडवर्डच्या आड गांज्याची विक्री

मुंबई शहरात ड्रग्ज माफियांचे जाळे दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. यात अनेक कोडवर्ड्सच्या नावे मुंबईत ठिकठिकाणी ड्रग्जची खुलेमाल विक्री सुरु आहे. मुंबईत या नशेबाजांमध्ये आता ‘न्याहरी’ हा कोडवर्ड मोठ्याप्रमाणात वापरला जात आहे. हा कोडवर्ड कानात सांगितल्यानंतर रस्त्यावरील टपऱ्यांमध्ये विकला जाणारा गांजा अगदी सहज मिळतो. अशात माटुंगा रोड स्थानकाजवळील उड्डाणपुलाखाली एक महिला खुलेआम ड्रग्ज विकत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामुळे मुंबईत ‘उडता पंजाब’ सिनेमातील कथा सत्यात घडतेय असचं चित्र निर्माण झालं आहे.

माटुंगा रोड रेल्वे स्थानकालगत असलेल्या सेनापती बापट मार्गावरील उड्डाण पुलाखाली राहणारी एका महिला गेल्या अनेक वर्षांपासून गांजा विक्री करतेय. पोलिसांकडून या महिलेवर वेळोवेळी कारवाई झाली, यात दोन दिवसांपूर्वी गांजा विक्रीचा व्हिडीओ व्हायरल होताच, माहिम पोलिसांनी संबंधित महिलेच्या सामानाची पुन्हा झाडाझडती घेतली, मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. दुसरीकडे माटुंगा स्टेशन परिसरालगत परिसरातही ही महिला गांजा विक्री करत होती. मात्र पोलिसांच्या कारवाईमुळे गेल्या 4 महिन्यांपासून तिच्या ड्रग्ज विक्रीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे माटुंगा रेल्वे स्थानक परिसर ड्रग्ज विक्रेत्यांचा अड्डा बनतो की काय असे चित्र निर्माण झाले आहे.

या नशेबाज तरुणांना कुठल्याही नव्या ठिकाणी अवघ्या पाच मिनिटांत ड्रग्जची माहिती मिळते. दरम्यान माटुंगा पश्चिम येथील सेनापती बापट मार्गावरील रेल्वेजवळील झोपड्यांवर यापूर्वीही पालिका आणि रेल्वे प्रशासनाने कारवाई केली, मात्र अतिक्रमण करणारे पुन्हा झोपड्या उभारून राहतात. आता उच्च न्यायलयाच्या आदेशानंतर सर्वच झोपडपट्ट्यांवर कारवाई होईल अशी अपेक्षा माजी नगरसेविका शीतल देसाई यांनी व्यक्त केली.

दरम्यान संबंधित महिलेवर लक्ष ठेवत असून ड्रग्ज विक्री करताना ती आढळल्यास तिच्यावर वेळोवेळी कारवाई करण्यात येईल, अशी माहिती माहिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.


एअरपोर्टवर गर्दी, टेक ऑफआधी 4 तास पोहोचा; नव्या गाइडलाइन्स जारी

First Published on: December 14, 2022 9:46 AM
Exit mobile version