मुलाच्या मृत्यूमुळे महापालिकेच्या अडचणी वाढल्या

मुलाच्या मृत्यूमुळे महापालिकेच्या अडचणी वाढल्या

मुंबई महापालिका

वरळी येथे सागरी किनारा मार्ग प्रकल्पाच्या(कोस्टल रोड प्रकल्प)कामांसाठी खोदलेल्या खड्डयात पडून झालेल्या मुलाच्या मृत्यूमुळे महापालिका अडचणीत आली आहे. मालाड येथे गटारात पडून मुलाचा मृत्यू झाल्याने स्वत:च्या अंगावर जबाबदारी न घेणारी महापालिका आता वरळीतील दुर्घटनेमुळे अडचणीत आली आहे. त्यामुळे महापालिकेला या प्रकरणात जबाबदारी झटकता येणार नसून कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे त्या मुलाचा मृत्यू झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.

प्रिन्सेस स्ट्ीट ते वरळी सि लिंकपर्यंतच्या सागरी मार्ग प्रकल्पाचे काम तिन टप्प्यात सुरु आहे. वरळी येथे अमरसन्स ते वांद्रे दरम्यान सागरी किनारा मार्ग प्रकल्पाच्या कामासाठी वरळी येथे खड्डा खणला होता. परंतु या खोदकामाच्या खड्ड्यात पडून १२ वर्षीय बबलूकुमार रामपुनील पासवान या मुलाचा मृत्यू झाला. हा मुलगा वरळी मद्रासवाडी येथे राहणारा होता आणि झोपडपट्टी शौचालय नसल्याने उघड्यावर शौचास बसण्यासाठी तो त्या भागात गेला होता. परंतु महापालिकेच्या कंत्राटदाराने खोदकामाच्या ठिकाणी सुरक्षित बॅरेकेट्स तथा धोक्याचा फलक लावला होता. शिवाय त्याठिकाणी सुरक्षा रक्षकही तैनात होता. तरीही हा मुलगा या खड्डयात कसा पडला असा प्रश्न महापालिकेला पडला आहे. महापालिकेने या कामांसाठी कंत्राटदाराची नेमणूक केल्यामुळे कंत्राटदाराचा निष्काळजीपणा उघड झालेला आहे. त्यामुळे कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे महापालिका प्रशासन अडचणीत सापडले आहे.

गोरेगाव पूर्व येथील गटारात पडलेल्या दीड वर्षी दिव्यांशचा चार दिवसांनंतरही अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे गटार उघडा असल्याने रहिवाशांकडून याचे खापर महापालिकेवर फोडले जात आहे. तर गटारावरील ढापे कुणीतरी बाजुला केल्याचा दावा करत महापालिका अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी रहिवाशांनी रविवारी पोलिस ठाण्यावर मोर्चाही नेला होता. परंतु पोलिसांनी अद्यापही गुन्हा दाखल करून घेतलेला नाही. त्यामुळे गोरेगाव प्रकरणात वाचलेल्या महापालिकेची अडचण सागरी मार्गाच्या कामांत मृत्यू झालेल्या मुलामुळे वाढली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मद्रासवाडीत शौचालय असतानाही हा मुलगा तिथे शौचास आला होता. त्यामुळे खुल्या जागेवर शौचास बसणे हे नियमांचे उल्लंघन आहे. त्यामुळे मुलाचा मृत्यू झाला ही बाब दुर्देवी असली तरी महापालिकेने सर्व सुरक्षिततेच्या उपाययोजना करूनही त्या मुलाचा मृत्यू झाल्यास मुलाचा दोष समोर येईल. येथील रहिवाशांनी खोदकांच्या ठिकाणचे बॅरिकेट्स तोडून टाकले होते. तसेच त्यांच्याकडून सुरक्षा रक्षकांनाही दमदाटी व्हायची,असे बोलले जात आहे. त्यामुळे महापालिका या प्रकरणात कोणती भूमिका घेते हे महत्वाचे ठरणार आहे.

First Published on: July 15, 2019 5:44 AM
Exit mobile version