तुकाराम मुंढेंच्या निर्णयामुळे मनपा आयुक्त अडचणीत

तुकाराम मुंढेंच्या निर्णयामुळे मनपा आयुक्त अडचणीत

नवी मुंबई महानगरपालिका

तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महासभेला विचारात न घेता काही निर्णय स्वतंत्र घेतले होते. या निर्णयांचा फटका मनपा आयुक्त रामास्वानी एन. यांना बसला आहे. शनिवारी झालेल्या महासभेत प्रशासकीय अधिकार्‍यांना बडतर्फ आणि सेवेत सामावून घेण्याच्या विषयावरून नगरसेवकांनी महापौरांच्या माध्यमातून आयुक्तांना कोंडीत पकडले. त्यामुळे आयुक्तांच्या अडचणीत वाढ झाली. आम्ही जे सांगू तेच तुम्हाला ऐकावे लागेल. तुमच्या मर्जीप्रमाणे चालता येणार नाही, असा सज्जड दम महापौर जयवंत सुतार यांनी बोलताना दिल्याने आयुक्तांना शांत रहावे लागले. यातून काही अधिकारी जरी सुखावले असले तरी काही अधिकारी दुखावले आहेत.

आयुक्तांसह सर्वांच्या मंजुरीनेच कामे
विद्युत विभागामधील उपरी वीज वाहिन्या व इतर कामांसाठीचा ठपका सहशहर अभियंता जी. व्ही. राव यांच्यावर ठेवण्यात आला आहे. वास्तविक यामधील कोणताच निर्णय राव यांनी एकट्याने घेतलेला नाही. आयुक्तांच्या परवानगीने सर्व प्रस्ताव मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात येतात. निविदा समिती, आयुक्त, सर्वसाधारण सभा, स्थायी समिती यांच्या मंजुरीनंतरच कामे केली जातात. कामे केल्यानंतर मुख्य लेखा वित्त अधिकारी सर्व नियम तपासून आयुक्तांच्या सहीनंतर बिले काढत असतात, असे असताना एकट्या राव यांना जबाबदार कसे धरले जात आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महासभेला विश्वासात न घेता काही निर्णय घेतले. हे महासभेला मंजूर नाहीत. त्यामुळे सहशहर अभियंता जी. व्ही. राव यांच्यावर ठेवलेला ठपका अमान्य केला. शिवाय, सदरील प्रस्ताव नामंजूर करण्यात आला आहे. त्याचवेळी त्यांना लवकरात लवकर सेवेत सामावून घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
– जयवंत सुतार, महापौर, नवी मुंबई महानगरपालिका

सहशहर अभियंता जी. व्ही. राव यांच्यावर ठेवण्यात आलेला ठपका योग्य आहे. त्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय कायम रहावा यासाठी महासभेच्या पटलावर सदर विषय घेण्यात आला होता. मात्र, तो नामंजूर करण्यात आला आहे. प्रकाश कुलकर्णी यांच्या प्रकरणाविषयी ४ तारखेला उच्च न्यायालयात सुनावणी असून, महासभेने घेतलेला निर्णय त्या ठिकाणी मांडण्यात येणार आहे.
– रामास्वामी एन., आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका

First Published on: January 21, 2019 5:51 AM
Exit mobile version