LockDown: येऊरच्या जंगलावर ड्रोनची करडी नजर

LockDown: येऊरच्या जंगलावर ड्रोनची करडी नजर
बोरीवली संजय गांधी नॅशनल पार्कच्या लगतच असलेले येऊरचे जंगल हे ठाण्यातील एक भाग आहे. राज्यातील लॉकडाऊनचा गैरफायदा घेत समाजकंटकांकडून जंगल परिक्षेत्रात अनधिकृत कारवायांना जोर पकडला आहे. या सर्व कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि वनक्षेत्रातील बारीक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आता ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीचे संस्थापक रोहित जोशी यांनी ड्रोन तंत्रज्ञानाचा पर्याय सुचविला होता. त्यानुसारच मुख्य वनसंरक्षण (वन्यजीव) पश्चिम विभागचे अपर प्रधान सुनील लिमये यांच्या हस्ते येऊर येथे ड्रोन गस्तीसाठीच्या कंट्रोल रूमचे उद्घाटन करण्यात आले आहे. त्यामुळे आता येऊर आणि तुंगारेश्वर परिक्षेत्रातील घडामोंडीवर ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे.

येऊन वन परिक्षेत्राचा भूभाग हा ५९ चौरस किमी असा विस्तीर्ण असून उंच डोंगर आणि दर्याखोऱ्यांचा आहे. येऊर परिक्षेत्रात अवैध दारूभट्टया आणि अतिक्रमणे, मानवनिर्मित वणवे आणि लोकांचा होणारा अपप्रवेश तसेच शिकारीचा प्रयत्न आदी गोष्टी वाढत आहेत. एखाद्या अवैध घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पोहचण्यास बराच कालावधी लागतो. तोपर्यंत संबधित आरोपी पळून जातात. त्यामुळे वन गुन्हयाचे प्रमाण रोखण्यात कर्मचाऱ्यांना अपयश येते. याच पार्श्वभूमीवर येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीचे संस्थापक रोहित जोशी यांनी ड्रोन तंत्रज्ञानाचा पर्याय सुचविला होता. तसेच विनामूल्य उपलब्ध करून देण्यासंदर्भात सहमती दर्शविली हेाती. त्यानुसार येऊर एन्व्हायर्नमंटल सोसायटी आणि ड्रोन एज आणि वन अधिकारी यांच्यात संयुक्त बैठकही पार पडली. येऊर परिक्षेत्रात जंगल संवर्धन तसेच वन विभागाच्या कर्मचा-यांची सुरक्षितता यासंबधी ड्रोन कॅमेरा तंत्रज्ञानाचा कशाप्रकारे उपयोग करता येईल तसेच अनेक गोष्टींवर कशाप्रकारे लक्ष ठेवले जाऊ शकते याची सविस्तर माहिती जोशी यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली होती. तसेच जंगलातील गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होऊन वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना ड्रोनच्या माध्यमातून कारवाई करण्यास सुलभ जाणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या पायी गस्त घालण्याच्या वेळेची ८० टक्के बचत होणार आहे. वनविभागाने कारवाई केलेल्या ब-याच गुन्ह्यात ओरीपी पुरेशा पुराव्यांअभावी सुटतात, त्यामुळे ड्रोन द्वारे प्राप्त परिस्थिती जन्य ठोस पुरावे गुन्हेगारांना शिक्षा मिळावी या हेतूने न्यायालयीन कामाकरीता प्रभावी ठरणार आहेत. त्यामुळे आता ड्रोन च्या माध्यमातून येऊरच्या हालाचालीवर वनविभागाची करडी नजर असणार आहे

यावर करडी नजर …

वन्य प्राण्यांच्या शिकारी
अनधिकृत बांधकामे
अवैध दारू निर्मिती
नैसर्गिक मानवनिर्मित वणवे
प्राण्यांच्या गतविधींवर लक्ष
अवैध उत्खन्न आणि खाणकामावर लक्ष
मनुष्य व जनावर संघर्ष
अवैध वृक्षतोड
First Published on: May 12, 2020 8:31 PM
Exit mobile version